वाडा : तालुक्यातील पिंजाळ या बारमाही वाहणाऱ्या नदीतून पीक व मलवाडा गावांच्या हद्दीत बेसुमार वाळू उपसा अगदी राजरोसपणे सुरु असून ती रोखण्यासाठी अनेकदा हाती घेतलेली मोहीम निष्पळ ठरली आहे. काही दिवसांपूर्वी पीक ग्रामपंचायतीने रेतीउपसा बंदीचा ठराव देखील मंजूर केला होता. मात्र आता पुन्हा रेतीउपसा सुरु झाला असून मलवाडा गावाच्या हद्दीतून वाळू वाहतूक केली जात आहे. मात्र विक्रमगड महसूल विभाग डोळ््यावर पट्टी बांधून असल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत.पिंजाळ नदीवर पीक व मलवाडा गावाच्या हद्दीतून बेसुमार वाळूउपासा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असल्याने निसर्गाने नटलेल्या या नदीचे अस्तित्व संपुष्टात येते आहे. यानंतर वनविभागाने कार्यवाही केल्याने धाबे दणाणलेल्या वाळू तस्करांनी आपला मोर्चा मलवाडा हद्दीकडे वळवला असून तेथून आताही बेसुमार वाळूउपसा सुरु आहे. रात्री मलवाडा मार्गे या वाळूची वाहतूक केली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महसूल विभाग मात्र आपल्या हद्दीच्या अडचणी दाखवून कारवाई टाळत आहेत. हद्द कुठलीही असली तरी याचा फटका मात्र जवळपास ५ हजार लोकांच्या पिण्याच्या पाण्याला बसणार असल्याने तालुक्याच्या हद्दीचा विचार न करता प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे.पिंजाळ नदीवर दिवसा होणारा वाळूउपसा महसूल विभागाच्या लक्षात आणून सुद्धा कुठलीही कारवाई का झाली नाही. यात अधिकाऱ्यांचे हात ओले होतात का? असा सवाल नागरिकांनी केला असून या प्रकरणी लक्ष घालून पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी पिंजाळ नदी वाळू तस्करांच्या तावडीतून पूर्णत: मुक्त करावी आता या प्रशासनाविरोधात उपोषण केले जाईल असे प्रविण पांडुरंग पाटील यांनी सांगितले.या वाळू ठियांचा लिलाव झाला आहे काय असल्यास कधी? आणि किती रकमेला झाला आहे. किती ब्रास वाळू काढण्याची परवानगी आहे, व किती काढली जाते आहे. याची वाहतूक परवान्यानुसार होते का? याची तपासणी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. (वार्ताहर)
वाळूउपसा रोखणार कधी?
By admin | Published: January 02, 2017 3:35 AM