- वसंत भोईरवाडा : तालुक्यातील कुडूस- चिंचघर-गौरापूर या रस्त्याच्या मजबूतीकरण व रूंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील देवघर या गावाच्या हद्दीत छोट्या पुलाचे काम सुरू असून ते अत्यंत संथगतीने सुरू आहे. पावसाळ्याला अवघे काही दिवस उरले असून त्याआधी हे काम न झाल्यास या मार्गावरील वाहतूक बंद होण्याची भीती या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.तालुक्यातील वर्दळीचा असणारा कुडूस - देवघर - गौरापूर या अंतर्गत रस्त्याच्या मजबूतीकरण व रूंदीकरणाचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. कुडूस ते चिंचघर हा १३०० मीटरचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा तर उर्वरीत चिंचघर ते गौरापूर हा डांबरी होणार आहे. रस्त्याचे काम सुरू असून देवघर या गावाच्या हद्दीत छोट्या पुलाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे. आता पर्यंत फक्त पुलाच्या खालच्या भागाचे काम करण्यात आले आहे. दरम्यान, ठेकेदार संदीप गणोरे यांनी पावसाळ्या पूर्वी काम पूर्ण करु असे सांगितले आहे.यंदाचा पावसाळा धुवॉँधार असून जून, जुलैमध्ये पावसाचे ९७ टक्के प्रमाण असणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. रविवारपर्यंत पाऊस कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे. होणार पावसाळा आता फक्त काही दिवस उरले असून पावसाआधी पुल न झाल्यास या मार्गावरील वाहतूक बंद होण्याची भीती या परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.या मार्गाचे काम वेळेत सुरू न केल्याने कुणबी सेना, स्वाभिमान संघटना यांनी आंदोलने केलीत तसेच चिंचघर कुडूस येथे असलेल्या शाळांच्या प्रशासनाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनाला काम सुरू करण्यास भाग पाडले होते. अखेर या आंदोलनाची दखल घेऊन काम सुरु केले आहे. मात्र काम संथगतीने सुरू असून पावसाआधी रस्त्याचे काम होणे शक्य नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी वाहतूक पुलाशेजारील शेतातून केली आहे. आणि पाऊस पडल्यास ही वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युध्दपातळीवर पुलाचे काम करण्यात यावे अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत. या रस्त्याचे ठेकेदार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही . त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी मी बेमुदत उपोषण केले होते. त्यानंतर काही प्रमाणात सुधारणा झाली. या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. पुलाबाबत दिरंगाई झाल्यास व पावसाआधी काम पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडू- प्रदीप हरड, उपतालुका प्रमुख, कुणबी सेनाया पुलाच्या फुटींगचे (पाया भरणी)चे काम झाले असून पडदी भरून स्लॅब टाकण्याचे काम शिल्लक आहे. येत्या आठ ते दहा दिवसात हे काम होईल तसेच या रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून गुंज-काटी येथून रस्ता आहे. दोन किलोमीटर अंतर वाढेल पण वाहतूक बंद होणार नाही.- विनोद घोलप, शाखा अभियंतापंतप्रधान ग्रामसडक योजना
कुडूस-चिंचघर-गौरापूर रस्त्याची गाडी फास्ट कधी धावणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 2:06 AM