हुसेन मेमनलोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : पालघर जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात वसई-विरार महापालिका वगळता \ जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घरटी थंडी, ताप, सर्दी आणि अंगदुखीचे रुग्ण आढळत आहेत. हे रुग्ण सारी, तसेच विषाणूजन्य आणि वातावरणातील तापाचे रुग्ण आहेत. ग्रामीण भाग तापाने फणफणला आहे.सारी ताप आणि कोरोनाची लक्षणे सारखीच आहेत. सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांमध्ये जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार तीनशे रुग्ण या तापाचे आढळून आले आहेत. खाजगी दवाखान्यातील वास्तव समोर आल्यास, जिल्ह्यातील भयावह विस्फोटक आकडेवारी समोर येईल. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा व्याप, त्यात सारीचा ताप, अशी स्थिती निर्माण झाली आहे.सध्या कोरोनाचे रुग्ण खेडोपाडी आढळून येत असून, गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी खेड्यापाड्यातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही सारी तापाने जिल्ह्याला विळखा घातला आहे. ग्रामीण भाग तापाने फणफणला आहे. थंडी, ताप, सर्दी आणि अंगदुखी ही कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत. हीच लक्षणे सारी आणि विषाणूजन्य तापाची आहेत. ही लक्षणे असलेले रुग्ण ग्रामीण भागात प्रत्येक घरी आहेत. या रुग्णांनी सरकारी दवाखान्यात येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन यंत्रणांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, त्याला अल्प प्रतिसाद मिळत आहे.रुग्णांची गैरसोयवाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्यामुळे ठिकठिकाणी रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे नातेवाईकही त्रस्त आहेत.
खाजगी रुग्णालयांतही कोविडचे उपचारखेड्यापाड्यातील रुग्ण सरकारी वैद्यकीय सेवेकडे पाठ फिरवून, कोरोनाच्या दहशतीने खाजगी दवाखान्यात उपचार करून घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रुग्णांमधूनच मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत असल्याचा सरकारी वैद्यकीय यंत्रणांचा आरोप आहे. खेडोपाडी आरोग्य कर्मचारी तपासणीसाठी जातात, मात्र, त्यांच्याकडे रुग्णांची माहिती लपवली जाते. काही वेळा या कर्मचाऱ्यांशी हुज्जतही घातल्याचे प्रकार घडत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.सारी आणि कोरोनाची लक्षणे सारखीच असल्याने त्याला अटकाव करण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात १०० अँटिजन चाचण्या करण्यात येणार आहेत. जव्हार तालुक्यात तशी सुरुवातही करण्यात आली आहे. खाजगी डॉक्टरांना लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना सरकारी दवाखान्यात पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- संजय लोहार, तालुका वैद्यकीय अधिकारी, जव्हार
रोज अनेक रुग्णांना जावे लागते परतसध्या कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक रुग्णांवर वेळीच उपचार होत नसल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक त्रस्त आहेत. अनेक रुग्णांना योग्य उपचाराअभावी परत फिरावे लागत असल्याचेही दिसून येत आहे.