पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या १५ आणि पंचायत समितीच्या १४ जागांवर मंगळवारी झालेल्या पोटनिवडणुकीतील मतदानादरम्यान आदिवासीबहुल भागात उत्साह दिसत होता. पहिल्या दोन तासात ११.४० टक्के मतदान, दीड वाजता ४६.९ टक्के, ३.३० वाजता ५१.१५ टक्के मतदान झाले. दरम्यान, अखेरीस जिल्ह्यात ६६ टक्के मतदान झाले. मागच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ६३ टक्के मतदान झाले होते. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. बुधवारी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल.
पालघर जिल्हा परिषदेच्या १५ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. त्यात राष्ट्रवादी ७, भाजप ४, शिवसेना ३ व सीपीएम १ अशा राजकीय पक्ष सदस्यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी एकत्र निवडणूक न लढविता स्वतंत्र चुली मांडल्याने या संधीचा फायदा उचलत भाजपला मताधिक्य वाढविण्यात यश मिळते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी आपले सुपुत्र रोहित गावित यांना वणई गटातून उमेदवारी मिळविल्याने शिवसेनेने ही निवडणूक गांभीर्याने घेत प्रतिष्ठेची बनवली आहे. दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत १५ सदस्य निवडून आणण्यात मोठी भूमिका बजावणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी विक्रमगड तालुक्यातील आलोंडे हा गट वगळता अन्य ठिकाणी जास्त रुची न दाखविल्याने राष्ट्रवादीच्या ७ जागांमध्ये घट होण्याची शक्यता आहे.