पारोळ : वसई तालुक्यात पंचायत समितीवर कोणाचीही एकहाती सत्ता न आल्याने आता कोणत्या तरी दोन पक्षांना हातमिळवणी करून सत्ता स्थापन करावी लागणार आहे. आठ गण असलेल्या पंचायत समितीमध्ये बहुजन विकास आघाडी ३, शिवसेना ३ आणि भाजपा २ असे उमेदवार निवडून आले आहेत. बहुमताचा पाच हा आकडा कोणत्याही राजकीय पक्षाने पार केला नसल्याने आता बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेला सत्ता स्थापन करायची असल्यास त्यांना मदतीची गरज भासणार आहे. तर, दुसरीकडे भाजपने आपले पत्ते उघड केले नसून त्यांनी सध्या ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.तालुक्याच्या पंचायत समितीवर बहुजन विकास आघाडीची सत्ता होती तर विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे तीन आमदार निवडून आल्याने पक्षाची ताकद वाढली होती. त्यामुळे या पंचायत समिती निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची सत्ता येईल असे जाणकारांचे मत होते. पूर्व भाग हा या पक्षाचा बालेकिल्ला असल्याने भाताणे गटावर या पक्षाची सत्ता अवलंबून होती, पण भाताणे गटात आणि भाताणे, मेढे, गणात शिवसेना व श्रमजीवी संघटनेने युती करून नाराजीचा फायदा घेत बहुजन विकास आघाडीचा हा बालेकिल्ला ताब्यात घेतला. तर तिल्हेर शिवसेना, कळंब आणि अर्नाळा किल्ला गण भाजपने काबीज केले. त्यामुळे बहुजन विकास आघाडीला सत्तेपासून मुकावे लागले. आता सत्तेसाठी कोणकोणाला मदत करते, याकडे तालुक्याचे लक्ष आहे. तर जिल्ह्यात कोण युती तसेच आघाडी करते यावरही वसई पंचायत समिती स्थापनेचे सत्ता समीकरण अवलंबून आहे.>वसईत सत्तेसाठी भारतीय जनता पार्टी महत्त्वाचा घटक असून बहुजन विकास आघाडी वा शिवसेनेसोबत सत्तेत जायचे हे आता वरिष्ठ पातळीवर ठरवले जाईल.- मनोज पाटील,उपाध्यक्ष, वसई विरार भाजपा>वसई पंचायत समितीत सेनेने ३ जागा जिंकल्या असून असून सत्तेसाठी भाजपला सोबत घेण्याची बोलणी सुरू आहेत. युती झाल्यास सभापती व उपसभापती याबाबत चर्चेतून निर्णय घेतला जाईल.- विजय पाटील, शिवसेना नेते
वसई पंचायत समितीत कुणाची येणार सत्ता?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 1:02 AM