रविंद्र साळवे / मोखाडा२७ नोव्हेंबरला होणाऱ्या मोखाडा नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु असून शनिवार पासून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराला सुरवात करण्यात आली आहे. रविवारी वनगानी आंबेपान वारघडपाडा घोसाळी आदी परिसर पिंजून काढला. तसेच राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी आज आघाडीच्या निवडणूक पक्ष कार्यालयाचे उदघाटन करून प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी उपस्थित माजी आदिवासी विकास मंत्री राजेंद्र गावित जिल्हा अध्यक्ष मनीष गणोरे यांनी प्रचार करून मतदारांच्या भेटी घेतल्या परंतु अद्याप तरी सेनेच्या वरिष्ठ पद्धधिकाऱ्यांकडून प्रचाराला सुरवात करण्यात आलेली नाही. सेना -भाजपा केंद्रातील व राज्यातील सत्तेत भागीदार असूनही या निवडणुकीत एकमेकांच्या विरुद्ध आमने - सामने उभे आहेत. त्यामुळे निवडणूकीत चुरस निर्माण झाली आहे. यामुळे विजयाची शिखर गाठण्यासाठी कोण कोणाला कशा प्रकारे धूळ चारणार? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीने केलेली आघाडी निवडणुकीत मतदारांवर किती प्रभाव पाडते? हे पाहणेही महत्वाचे आहे. मोखाडा ग्रामपंचायत असताना १७ पैकी ८ सदस्य राष्ट्रवादीचे तर ७ सेनेकडे होते उर्वरित २ काँग्रेस असे संख्याबळ होते. सरपंच राष्ट्रवादीचा तर उपसरपंच पद सेनेकडे होते. परंतु सरपंच पदी असलेले नवनाथ थेतले यांनी सेनेत पक्ष प्रवेश केल्याने ग्रामपंचायतीच्या सत्तेच्या एकहाती चाव्या सेनेकडे आल्या. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य व आताचे सेनेच नियुक्त मोखाडा तालुका प्रमुख अमोल पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून सेनेत प्रवेश केला. यामुळे दुसरीकडे राष्ट्रवादीला खिंडार पडत गेले. पहिल्या पासूनच तालुक्यात मजबूत पकड असलेल्या सेनेच्या ताकदीत या झालेल्या राजकीय बदलामुळे आणखी भर पडली आहे. यामुळे सेनेने स्वबळाचा नारा देत ही निवडणुक अटी तटीची केल्याचे चित्र दिसत आहे. तसेच विष्णू सवरा यांना मंत्रिपद मिळाले आहे. तर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे हे मोखाड्यातील आहेत. त्यामुळे भाजपाची ताकद बरी आहे. त्याचबरोबर एकेकाळी सत्तेची गणिते जुळणाऱ्या राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीमुळे त्याचा जोर ओसरत चालला आहे. ही बाब विचारात घेऊन राष्ट्रवादीने काँग्रेस सोबत आघाडी करून शह देण्याचा प्रयत्न केला आहे . यामुळे आघाडीचा किती प्रभाव या निवडणुकीत पडतो हे पाहणे महत्वाचे आहे. तसेच जुने मित्र असलेले सेना व भाजप एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने सत्तेची समीकरणे कोण जुळविणार? याच प्रश्नाची चर्चा सुरू आहे. सेना भाजप कि आघाडी याबाबत राजकीय विश्लेषाकडून तर्कवितर्क लढविले जात आहेत.
सत्ता समीकरण जुळविणार कोण?
By admin | Published: November 16, 2016 4:14 AM