शुभदा सासवडे / सफाळेविना अनुदानीत शाळांमधील शिक्षकांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी औरंगाबाद येथे आंदोलन करीत असतांना मृत झालेल्या जाफराबाद येथील गजानन खरात यांच्या निराधार कुटुंबास येथील गुरुकुल व्हॉटसअॅप ग्रुपने ५५ हजार ५५५ रुपयांचा निधी दिला आहे व सोशल मीडियाचादेखील किती विधायक वापर करता येऊ शकतो याचा आदर्शही घालून दिला आहे.मराठवाडयातील जालना जिल्ह्यÞातील जाफराबाद येथील समर्थ विद्यालयात विना अनुदानित शाळेत कार्यरत असलेल्या गजानन विठोबा खरात या शिक्षकाचा विना अनुदानित शाळांना अनुदान मिळावे या करिता औरंगाबाद येथे आंदोलन करित असतांना शुक्र वार दि.१० जून २०१६ रोजी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांची आई चंद्रकला, पत्नी सुकेशनी व मुलगा यश असा परिवार असून त्यांच्या पश्चात कमावणारी एकही व्यक्ती नसल्याने व त्यांची शेती ही नसल्याने या कुटुंबावर मोठे संकट कोसळले. ही घटना संपूर्ण राज्यभर वाऱ्यासारखी पसरली. ते विना अनुदानित शाळेत नाममात्र मानधनावर काम करत असल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होते. म्हणून ते शाळेच्या नोकरी व्यतिरिक्त अन्यत्र मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरिनर्वाह करीत होते. तसेच गावापासून शाळे पर्यंत सुमारे सहा किलोमीटर ते रोज पायी ये जा करीत होते. ही हकिगत प्रमोद पाटील अॅडमिन असलेल्या ‘गुरु कुल’ वहॉटस अॅप ग्रुप वर पोस्ट करण्यात आली. तदनंतर गुरु कुल सहाय्य निधी समिती स्थापन करून तिच्या माध्यमातून सहाय्य निधी जमा करण्यात आला. यात शिक्षकांनी पाचशे पासून दोन ते अडीच हजार रुपया पर्यंतची रक्कम जमा केली. ही रक्कम ५५ हजार ५५५ रुपये रक्कम खरात यांच्या जालना जिल्ह्यÞातील जाफराबाद (वरखेडा) या त्यांच्या मुळगावी जाऊन त्यांच्या पत्नी व आई यांच्या हाती गुरूवारी डॅरेल डिमेलो, प्रमोद पाटील, विलास पाटील,संजय पाटील, राम पाटील, सुधाकर ठाकूर आदींनी सुपूर्द केली. या वेळी गावचे पोलीस पाटील विठ्ठल डवणे, सामाजिक कार्यकर्ते गजानन उबाळे, मधुकर खरात, प्रकाश राऊत आदी उपस्थित होते.या बहुमूल्य मदतीबद्दल खरात यांच्या पत्नी व आई यांनी सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त केले .यापुढेही जर एखाद्या शिक्षकाच्या बाबतीत अशी दुर्दैवी घटना घडली अन कुटुंबापुढे आर्थीक संकट उभे राहिले तर त्यालाही अशाच सहृदय मदतीचा हात देण्याचा मनोदय या ग्रृपमधील शिक्षकांनी व्यक्त केला आहे. त्यांचे कौतुक होत आहे.
व्हॉटसअॅप ग्रुपचे ५५ हजार ५५५
By admin | Published: November 16, 2016 4:09 AM