डहाणू : डहाणू नगर परिषद कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या संपर्कातील पाच जणांना क्वॉरंटाइन करण्यात आले होते. मात्र, नगर परिषद कार्यालय सील न केल्याने डहाणूतील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत नगर परिषद कार्यालय सुरू कसे? प्रशासन लोकांच्या आरोग्य व जीवाशी का खेळत आहे? असे सवाल केले आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळताच बँका, सोसायट्या, गाव-पाडे, वार्ड ताबडतोब सील करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तत्परता दाखवणारे प्रशासन नगर परिषद कार्यालय सील का करत नाही? दररोज शेकडो नागरिक या कार्यालयात जातात. असे असताना नगर परिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित लोकांच्या जीवाशी का खेळत आहे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
डहाणू नगर परिषद कार्यालय हे शहराच्या मध्यवर्ती भागात असून नजीकच रेल्वे स्टेशन, पोलीस ठाणे, मुख्य बाजारपेठ, बस आगार, बँका, रहिवासी संकुले, शासकीय व खाजगी वाणिज्यिक आस्थापने, शेकडो दुकाने आहेत. दरम्यान, कर्मचाºयाला कोरोना झाला असतानाही नगर परिषद कार्यालय सील न करता सॅनिटायझरच्या नाखाली नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. डहाणूतील औषध दुकानांत औषधांशिवाय इतर वस्तूंची होणारी विक्री, औषधे घेताना नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. तर सायंकाळी ५ वाजल्यानंतर दुकाने उघडी ठेवली म्हणून दुकानदारांना नगर परिषदेकडून आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबत दुकानदारांनी सौरभ कटियार यांना निवेदन सादर करून प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली.यापूर्वी डहाणू पोलीस ठाण्याच्या १५ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. तरीही, पोलीस ठाणे सील केले नव्हते. डहाणू नगर परिषद कार्यालयातील कर्मचारी फक्त दोन दिवस आधी कामावर आल्याने त्यांचा संपर्क फारच थोड्या लोकांशी आला होता. त्यापैकी पाच जणांना क्वारंटाइन केले होते. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. संपर्कातील इतरांचा तपास सुरू आहे. - सौरभ कटियार, उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी