वसई : आपल्या हद्दीत आगीच्या धोक्यांना प्रतिसाद आणि अग्नीशमन योजनेची माहिती भारताचे नियंत्रक आणि महालेखापरिक्षकांना (कॅग) का सादर केली नाही? याबाबतचा खुलासा द्यावा असा आदेश महाराष्ट्र राज्याच्या प्रधान महालेखाकारांनी वसई विरार महापालिकेला दिला आहे.याबाबत शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांनी राज्य सरकारकडे तक्रार केली होती. तसेच महापालिका आयुक्तांकडून याप्रकरणी खुलासा मागवावा अशी मागणीही त्यांनी केली होती. याची दखल घेऊन त्यांनी महापालिकेकडून हा खुलासा मागवला आहे.अग्नीशमन यंत्रणेकडे अत्याधुनिक साधन सामुग्री अस्तित्वात आहे तर या संबंधीची माहिती महालेखापरिक्षकांना का उपलब्ध करून दिली नाही. यात काही गैरप्रकार होत असल्याचा संशय त्यांनी उपस्थित केला आहे. महापालिका हद्दीत शेकडो चाळींमध्ये व इमारतींमध्ये हजारोंच्या संख्येने नागरीक दाटीवाटीने रहात आहेत. त्यांच्या अग्नीसुरक्षेबाबत प्रशासन अपुरे पडेल असाही त्यांचा आरोप आहे. याची दखल घेत महापालिकेकडून खुलासा मागवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काळात महापालिकेच्या प्रत्येक कारभारावर महालेखापरिक्षकांचे लक्ष राहिल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, वसई विरार महापालिका नागरीकांकडून अग्नीशमन कर वसूल करते. मात्र त्या तुलनेत सुरक्षा पुरवण्यासाठी महापालिकेकडे पुरेशी यंत्रणा अस्तित्वात नाही. नागरीकांच्या सुरक्षेसंबंधी प्रशासन आणि सत्ताधारी बहुजन विकास आघाडी गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कॅगला माहिती का दिली नाही? वसई-विरार महापालिकेला सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 3:56 AM