- पंकज राऊत बोईसर : तारापूर एमआयडीसीतील औद्योगिक क्षेत्र हे पर्यावरणाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील क्षेत्र झाले आहे. येथील पर्यावरणाच्या झालेल्या प्रचंड हानीला जबाबदार कोण? हे आकलनापलीकडे असून पाच दशकांतील पर्यावरणीय बदलाचा मागोवा घेतल्यास सर्वत्र भयावह परिस्थिती पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबरच सर्व वयोगटातील अनेकांच्या आरोग्यावर हाेणाऱ्या परिणामांची हानी कशी भरून काढणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रामुळे या संपूर्ण परिसराचा विकास होऊन आर्थिक सुबत्ता आली; पण प्रदूषणातील वारेमाप वाढीमुळे विकासाचा मार्ग विनाशाच्या दिशेने जात आहे. भविष्यकाळात येणारे संभाव्य धोके ओळखून वेळीच गंभीर दखल घेऊन प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी दूरदृष्टीसमोर ठेवून ठोस व योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्र व परिसरातील पर्यावरणाच्या झालेल्या हानीला मुख्य जबाबदार हे प्रदूषणाचे नियम अक्षरशः पायदळी तुडवून उत्पादन खर्च वाचवून जास्तीत जास्त नफ्याच्या मागे धावणारे काही उद्योजक तर आहेतच; पण या चुकीच्या व नियमबाह्य काम करणाऱ्यांना पाठीशी घालणारी यंत्रणाही तेवढीच जबाबदार आहे. औद्योगिक क्षेत्रासह परिसरातील शेतजमिनी, नाले, समुद्र व खाडीकिनारे इत्यादी अनेक ठिकाणची परिस्थिती जलप्रदूषणाच्या भस्मासुरामुळे अत्यंत भयावह झालेली पाहावयास मिळत आहे; पण त्याचबरोबरच विहिरी व कूपनलिकेचे पाणीही पिण्यायाेग्य राहिलेले नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.तारापूर औद्योगिक क्षेत्र संपूर्ण देशात प्रदूषणामध्ये प्रथम क्रमांकावर आल्याने येत्या काळात ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर येणारा काळ संकटाचा राहील, हे सांगायला कुणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. भविष्यातील हे संभाव्य धोके ओळखले पाहिजेत. हे सर्व पाहून न पाहिल्यासारखे केले जात असल्याने हे दुर्लक्षच उद्या मोठे संकट ठरणार आहे. प्रदूषणाच्या वणव्यात होरपळ हाेऊ नये म्हणून प्रदूषण टाळण्यासाठीच्या नियमांचे पालन काटेकाेरपणे करणे आवश्यक आहे. हव्यासाला थाेडा लगाम घातला तर प्रदूषणाची तीव्रता निश्चितपणे कमी होईल, अशी आशा पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास कोरोनापेक्षाही घातक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उद्योगांवर वेगवेगळ्या प्रकारच्या कितीही नोटिसा बजावण्याचा कांगावा केला तरी तारापूरमधील प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यावरणाचा सातत्याने होत असलेला ऱ्हास कोरोनापेक्षाही कैकपटीने घातक आहे, याचे भान येणे गरजेचे आहे. या ज्वलंत प्रश्नाकडे कुणीही फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र दिसत आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे मानवाच्या आरोग्य आणि स्वास्थ्यावर दुष्परिणाम होत असल्याने पर्यावरणपूरक विकासाची अत्यंत गरज असून ही सामूहिक जबाबदारी आहे. याची जाण ठेवून पर्यावरणाचा ऱ्हास नियंत्रणात आणण्यासाठी योग्य पद्धतीने कार्यवाही करण्याची गरज आहे.
औद्याेगिक क्षेत्र पर्यावरण ऱ्हासाला जबाबदार काेण? आर्थिक सुबत्ता पण विकासाचा मार्ग विनाशाकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 1:40 AM