- हितेन नाईकn लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : वाढवणवासीयांच्या सोबतीला आता जिल्ह्यातील किनारपट्टीवरील अनेक लोक पुढे येऊ लागले असून वाढवणविरोधातील संघर्षाची धार तेज होऊ लागली आहे. अशा वेळी बुधवारी रात्री स्थानिकांची मते जाणून घेण्यासाठी आलेले शिवसेनेचे पदाधिकारी तथा एनजीओच्या अध्यक्षांना लोकांनी संतप्त होत गावाबाहेरचा रस्ता दाखवला.
वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असेल, तर बंदरविरोधातील लढ्यात शिवसेना त्यांच्या सोबतीला असेल, असे जाहीर वक्तव्य आणि विश्वास शिवसेनापक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हावासीयांना दिला होता. असे असताना त्यांच्याच पक्षाचे पालघरमधील युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव परीक्षित पाटील आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी निर्माण केलेल्या ‘अभिनव जनसेवा असोसिएशन’ या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागाशी संबंधित संस्थेचे पदाधिकारी वाढवण गावात आले. या वेळी आम्ही आमच्या संस्थेकडून सर्वेक्षण करून इथल्या ग्रामस्थांचे वाढवण बंदराबाबत असलेले मत, सोयी-सुविधा, सामाजिक परिस्थिती, कोणत्या समाजाचे वास्तव्य आहे, व्यवसाय, त्यावरील दुष्परिणाम आदींबाबत सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पाठविणार असल्याचे एनजीओचे अध्यक्ष पाटील यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी आपण स्वतः शिवसेना पक्षाचे पदाधिकारी असताना आणि मागील अनेक वर्षांपासून वाढवण बंदराला स्थानिकांसह जिल्ह्यात विरोध होत असल्याचे सर्वश्रुत असताना लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी येण्याची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित करून स्थानिकांनी संस्थेचे अध्यक्ष परीक्षित पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना गावाबाहेरचा रस्ता दाखवला.
शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाशिवाय त्यांचे स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी एवढे मोठे पाऊल उचलण्याची हिंमत करू शकत नसल्याने सेनेच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात असून शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करीत नसल्याने स्थानिकांच्या संशयाला बळकटी मिळत आहे.दरम्यान, ठाण्यातील काही मातब्बर शिलेदारांनी वाढवणच्या आसपासच्या भागातील जमिनी अन्य काही लोकांच्या नावावर खरेदी केल्या असल्याचा सुगावा स्थानिकांना लागला असून या जमिनीचे खरे मालक कोण, याचा शोध घेतला जात आहे. यावरून तर्कवितर्क लढले जात आहेत.
बेइमानी कराल तर... ‘स्थानिकांशी बेइमानी कराल तर खबरदार!’ असा सज्जड दम सोशल मीडियावरून दिला जात आहे.
बंदराला शेवटपर्यंत आमचा विरोध राहणार असून सर्वेक्षण किंवा अन्य बाबीसाठी आता आलात म्हणून आम्ही शांत आहोत. परंतु पुढच्या वेळी शांत राहू असे कोणी गृहीत धरू नये.- विनिता राऊत, प्रभारी सरपंच.