नालासोपारा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरारच्या मौजे टोकरे येथील विरार फाट्याकडे जाणाऱ्या रोडवरील, पीरकुंडा दर्ग्याच्या पुढे, एका बॅगेत महिलेचे शीर गुरुवारी आढळले होते. २४ तासांत या हत्येचे गूढ गुन्हे शाखा युनिट तीनने उलगडले. पत्नीने मुलाला आपल्यापासून दूर नेऊ नये, यावरून झालेल्या कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती शनिवारी पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.
गुरुवारी गुन्हे शाखेच्या टीमला सापडलेल्या बॅगेत एका ज्वेलरी शॉपचे पाकीट मिळाल्याने महिलेची ओळख पटली. महिला नालासोपाऱ्याच्या रेहमतनगर येथे राहत असल्याची माहिती मिळाली. आरोपीने हत्या करून मृतदेह गोणीत भरून दुचाकीवरून नेला होता, ती दुचाकी पोलिसांना मिळाली. आरोपी हरीश हिप्परगी (४९) याला ताब्यात घेतल्यावर गुन्ह्याची हकीकत सांगितली.
गुन्ह्याचे गूढ उकलले -हरीश आणि त्याची मयत पत्नी उत्पला (५१) हे रेहमतनगर परिसरात राहत होते. उत्पला ही मुलाला पश्चिम बंगालला घेऊन जाणार असे बोलत असल्याने त्यांच्यामध्ये मुलांवरून कौटुंबिक वाद व्हायचे.
हरीशचे मुलावर खूप प्रेम होते, त्यामुळे त्याचा मुलाला नेण्यासाठी विरोध होता. या कारणावरून हरीशने रागाच्या भरात ८ जानेवारीला रात्री उत्पलाची गळा दाबून हत्या केली. मुलाने आईबद्दल विचारल्यावर आरोपीने आई माहेरी गेल्याचे सांगितले.