वसई : वसई-विरार महानगरपालिकेच्या गोखिवरे येथील डंपिंग ग्राउंडमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या बाबतीतील त्रास सुरू झालेले आहेत. या ठिकाणी होणारे वायुप्रदूषण थांबावे, यासाठी स्थानिक नागरिक सातत्याने मागणी करीत आहेत. आता केंद्र सरकारने वसई-विरार शहर महानगरपालिकेला वायुप्रदूषण रोखण्यासाठी १६ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. या अनुदानाचा वापर गोखिवरेतील डम्पिंग ग्राउंडमुळे होणारे वायुप्रदुषण रोखण्यासाठी करावा, अशी मागणी केली जात आहे.
वसई-विरार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक किरण भोईर यांनी आयुक्तांना याबाबत निवेदन दिले आहे. वसई-विरार महानगरपालिकेचा गोखिवरे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सध्या बंद आहे, मात्र येथे साचलेल्या कचऱ्याच्या डोंगरांमुळे वायुप्रदूषण अद्यापही सुरूच आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. धुरामुळे हवा प्रदूषित झाल्याने कित्येक लोक दमा, घसा खवखवणे, चक्कर येणे, उलटी होणे, बेशुद्ध पडणे, ताप येणे अशा रोगांनी त्रस्त झाले आहेत. अशा बाबींना अनुसरून २०१४ पासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिसा देऊनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आोग्य धोक्यात आले असून गोखिवरे व आजूबाजूच्या पाच किलोमीटरच्या परिसरात दुर्गंधीमुळे नागरिकांना दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे.वाढते प्रदूषण पाहता दि. २ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने पर्यावरण संवर्धनासाठी (वायुप्रदूषण रोखण्यासाठी) वसई-विरार शहर महानगरपालिकेस १६ कोटी अनुदान दिले आहे. त्याचा उपयोग या प्रकल्पातील प्रदूषण रोखण्यासाठी करावा, अशी मागणी माजी नगरसेवक किरण भोईर यांनी केली आहे.
किरण भोईर यांनी निवेदनात म्हटल्याप्रमाणे ४ नगरपालिका मिळून (वसई, नवघर-माणिकपूर, नालासोपारा, विरार) येथील डम्पिंग ग्राउंडसाठी जिल्हाधिकारी, ठाणे यांनी परवानगी दिली होती. त्यानंतर २००९ मध्ये महापालिका झाल्यानंतर संपूर्ण महापलिकेचा कचरा या डम्पिंग ग्राउंडमध्ये आण्ण्यास चालू केले. प्रथम कचरा हा २०० टन प्रतिदिन होता. पण वाढत्या लोकसंख्येनुसार आता तो ६५० टन प्रतिदिन इतका आहे. गेल्या पाच वर्षात या डम्पिंग ग्राउंडमध्ये साधारणतः ११ लाख ७० हजार टन इतका कचरा बिनाप्रक्रिया पडलेला आहे.
नागरिकांच्या आरोग्यास धोका
- पावसाळ्यात कचऱ्यापासून दुर्गंधीयुक्त चिखल निघून आजूबाजूच्या तलाव, विहीर, कूपनलिका यातील पाणी प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
- धुरामुळे हवा प्रदूषित झाल्याने परिसरातील कित्येक लोक दमा, घसा खवखवणे, चक्कर येणे, उलटी होणे, बेशुद्ध पडणे, ताप येणे अशा रोगांनी त्रस्त झाले आहेत.