हुसेन मेमन। लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : नगर परिषदेच्या पाच वॉर्डांची पोटनिवडणूक पार पडल्यानंतर प्रथमच बुधवारी पालिकेची सर्वसाधरण संपन्न झाली. नविन पाणी योजनेला व जयसागर धरणाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात आली. जव्हार शहरात १९६२ साली श्रीमंत राजे यंशवत मुकणे यांनी जव्हारकरांसाठी मोठा डॅम बांधून आताच्या लोकसंख्येला पुरेल ईतका पाणीसाठा करून ठेवला होता. मात्र आता वाढती लोकसंख्या पाहाता पुढील काळासाठी पाणी साठा वाढविण्याच्या दृष्टीकोनातून नगर परिषदेचे प्रयत्न सुरू असून त्याकरीता मुख्याधिकारी वैभव विधाते यांनी नविन पाणी पुरवठा योजनेचे पे्रझेन्टेशन केले. २०११ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या १२०४४ असून सन २०२१ पर्यत ती १७३८७ इतकी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जयसागरची सध्याची साठवण क्षमता २.०० एम.एल.डी. असून सन २०४९ पर्यत ती ३.५० एम.एल.डी. पर्यंत वाढवावी लागल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सध्या जयसागर मधून पाणी पुरवठा केला जात असून पुढे शहराला लागून असलेल्या डोमीहीरा खडखड धरण व सध्या कापरीचापाडा येथे असलेल्या बंधाऱ्यातून पाणी घेऊन ते शिरपामाळला साठविले जाते. ते पुढे जलशुध्दीकरण केंद्राकडे वळवून साठवण क्षमता वाढविण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. जव्हारमध्ये एकूण १.८० लाख लिटर क्षमतेची १ टाकी तर १.०० लाख लिटर क्षमतेच्या ४ टाक्या असून पुढे काही ठिकाणी पाणी साठा वाढवून २.०० लाख लिटर क्षमतेची नविन पाण्याची टाकी बांधण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी नगरसेवक अमोल औसरकर यांनी सनसेट पॉईट येथील लोकसंख्या पाहाता टाकीची क्षमता खूपच कमी असून तिची क्षमता वाढविण्याची गरज प्रतिपादन केली. त्यावेळी मुख्याधिकारी विधाते यांनी अतिरीक्त ३.०० लाख लिटर क्षमतेच्या टाकीची तरतूद करण्यात आलेली असून त्यातून तेथे पाणी पुरवठा करता येईल असे सांगितले. तसेच जयसागर धरणाची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने पूर्वी नगराध्यक्ष संदिप वैद्य यांनी जलसंपदा विभागाकडून जयसागर डॅमच्या पुढे बंधारा बांधून पाणी साठवणीचा प्रस्ताव सादर केला होता., त्याला शासनाकडून १.६० कोटी निधीही २५ आॅगस्ट २०१६ रोजी मंजूर करण्यात आला होता, त्यासाठी लागणाऱ्या एस्टीमेट व मान्यता प्रकियामध्ये टप्प्याटप्प्याने अडचणी निर्माण होऊ लागल्या, एस्टीमेटमध्ये १२ मीटर उंच बंधारा बांधण्याचा प्रस्ताव होता, मात्र जलसंपदा विभागाकडे फक्त १० मीटर बंधारा बांधण्यात अनुमती देण्याचे अधिकार आहेत. त्यापेक्षा उंचीच्या बंधाऱ्याला मेरी कडून मान्यता घ्यावी लागते, त्यामुळे ते मेरीकडे वर्ग करण्यात आले, तिने केलेल्या सर्वेक्षणानंतर नविन बंधारा न बांधता आहे, त्याच डॅमची मजबूती, पातळी व क्षमता तपासून पुढील निर्णय घेण्याबाबत सुचविले, याकरीता नगर परिषदेने लागणारी शासकिय फी रूपये ३ लाख भरून सर्वेक्षण करून घेतले.अखेर जलसंपदा विभागाने सुचविल्याप्रमाणे डॅमची उंची वाढवून घेण्याचे सूचित केल्यामुळे डॅमला धक्का न लावता उंची वाढविल्यास असलेल्या धरणाच्या साठ्वण क्षमतेत ६५ टक्के वाढ होणार आहे. तसेच डॅमला लागून जव्हार-सिल्व्हासा महामार्ग असून तो ही कॅचमेन्टच्या बाहेर असल्याचे नगराध्यक्ष संदिप वैद्य यांनी सांगितले. यासर्व प्रक्रियेमुळे जव्हारकरांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार असल्यामुळे सर्व नगरसेवकांनी हा ठराव संमत केला. ही जव्हारकरांसाठी आनंदाची बातमी आहे. तसेच जव्हार शहरातील ईदगाह मशिदीत पावसाळ्यात चिखल होऊन नमाज पठण करण्यास अडचणी येतात. म्हणून तेथे पेव्हरब्लॉक बसविण्याची मागणी माजी नगराध्यक्ष रियाज मनियार यांनी केली आहे. तसेच नगरसेवकांनी सुचविलेले ठराव संमत करण्यात आले आहे. यावेळी सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी पत्रकार आदि उपस्थित होते.
जयसागरची उंची वाढविणार
By admin | Published: June 29, 2017 2:42 AM