पंकज राऊतबोईसर : ग्रामविकास विभागाच्या शासन परिपत्रकानुसार पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये कारभार चालतो का? ग्रामपंचायतींच्या मासिक सभा व ग्रामसभेचे इतिवृत्त गटविकास अधिकाऱ्यांकडे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी वेळेत पाठवितात का? तसेच ते वेळेत सादर न करणाऱ्यांवर कोणती कारवाई केली? इत्यादी मुद्दे विधान परिषदेत गाजण्याची शक्यता आहे. आ. विनायक मेटे यांनी याची दखल घेतली असून तारांकित प्रश्नाद्वारे विधान परिषदेत प्रश्न विचारले आहेत. परिणामी ग्रामपंचायतींच्या कारभाराचे वास्तव समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव यांनी २४ नोव्हेंबरला पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून आ. मेटे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे व सविस्तर माहिती मागवली आहे. पालघर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी २५ नोव्हेंबरला जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांकडून उपरोक्त प्रश्नांची भागवार उत्तरे, पूरक टिप्पणीसह मेलद्वारे कार्यालयास पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.ग्रामपंचायतीची मासिक सभा व ग्रामसभेचे इतिवृत्त ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे वेळेत जमा करणे आवश्यक आहे. पालघर जिल्ह्यात इतिवृत्त वेळेत सादर केले जात नसल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय? सादर न करणाऱ्या ग्रामसेवकावर काय? या प्रश्नांची उत्तरे ११ डिसेंबरला विधान परिषदेत ग्रामविकास विभागाकडून मिळणार आहेत.