-आशिष राणे
वसई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिलेच राज्य हिवाळी अधिवेशन नागपूर मध्ये सुरू आहे, या पार्श्वभूमीवर बुधवार दि.18 डिसेंबर रोजी दुपारी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे एक शिष्टमंडळ मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले, या शिष्टमंडळा मध्ये कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो ,वसईतील मच्छीमार नेते तथा समितीचे सरचिटणीस संजय कोळी, उपाध्यक्ष ऍड कमलाकर कांदेकर ,युवाध्यक्ष पुनित तांडेल आदीं प्रतिनिधी उपस्थित होते.
समुद्रातील एलईडी लाईट व पर्ससीन जाळ्याने संपूर्ण मच्छीमारांचे संसार उद्ध्वस्त झालेले असून सोबत आज मासेमारी धंदा ही उध्वस्त झालेला आहे. त्यामुळे आपली आर्जव घेऊन या संदर्भात कृती समितीच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. चर्चेअंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृती समितीची वास्तव व्यथा ही मान्य करीत राज्य शासनाने यापूर्वी काढलेले दोन जीआर त्याची अंमलबजावणी होत नाही, हे माझ्याही निदर्शनांस आलेलं असल्याचे स्वतः मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान राज्य सरकारने देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री असताना दि.5 फेब्रुवारी 2016 ला पर्ससीन मासेमारी करण्यास बंदी आहे.असा कायदा आला, त्या कायद्यामध्ये 495 मासेमारीला दिलेले परवाने त्वरित रद्द करावेत व फक्त 500 मीटरची तीसुद्धा कोकणामध्ये 500 मीटरच्या जाळीचे मासेमारी 182 फिगर करण्यात आली होती,
आणि डहाणू पासून ते मुरुड जंजिरा पर्यंत 12 ही महिने बंदी असताना ससून डॉक बंदरांमध्ये 700 बोटी, मिरकरवाडा बंदरांत 400 व सागर आक्षी अलिबाग 300 बोटी असं दीड ते दोन हजार बोटी बेकायदेशीर परवानगी नसताना मासेमारी करत होत्या, आणि यांस माजी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांचा वरदहस्त होता तर सध्याचे प्रधान सचिव अनुपकुमार ( मत्स्यव्यवसाय) आणि सहआयुक्त (सागरी ) राजेंद्र जाधव यांच्या कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनांस यावेळी तांडेल यांनी आणून दिले, परिणामी मुख्यमंत्री ठाकरे यांनी समितीचे म्हणणं ऐकून घेतल्यावर या सर्वांवर योग्य ती कारवाई करावी व या दोन हजार भांडवलदारांच्या अनधिकृत ट्रॉलर चालू आहेत त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई केली जाईल.
तसेच एक बोट ही किनारपट्टीवर बेकायदेशीर चालू असेल त्यांच्यावर फौजदारी दावे दाखल करणे, त्या बोटी जप्त करणे व यापुढे विना परवाना मासेमारी होऊ नये, याकरिता कठोर पावले उचलण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती कृती समितीचे दामोदर तांडेल यांनी लोकमत ला दिली.