विरार : नालासोपाऱ्यात बेकायदा बांधकामांमुळे पाण्याचा निचरा होण्यास मार्गच न उरल्यामुळे गेल्या वर्षी नालासोपाºयामध्ये पावसाळ्यात पूरसदृश स्थिती उद्भवली होती. यात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र, रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाई करण्यास महापालिकेने नकार दिल्यामुळे यंदाही नालासोपारा बुडण्याची शक्यता असल्यामुळे नागरिक धास्तावले असून त्यांनी नालेसफाईचा आग्रह धरला आहे.
गेल्या वर्षी घरांमध्ये पाणी शिरल्याने नालासोपारावासीयांची दैना उडाली होती. तसेच आरोग्याच्याही समस्या उद्भवल्या होत्या. त्यामुळे यावर्षी शहरातील नालेसफाई योग्यरीत्या आणि वेळेवर व्हावी, यासाठी नागरिक सातत्याने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत.शहरातील राजकीय पक्ष तथा सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाला पत्र देऊन निळेगाव येथील चार तलावांच्या स्वच्छतेकडे पालिकेचे लक्ष वेधले आहे. या तलावांतील सर्व पाणी सक्शन पंपाच्या साहाय्याने बाहेर काढून तलाव रिकामे केल्यास पावसाळ्यात पाणी रस्त्यावर साचून न राहता किंवा कोणाच्या घरात अथवा दुकानांमध्ये न शिरता पाण्याचा तलावांत निचरा होईल. यामुळे पूरस्थितीवर काहीसा निर्बंध येईल, असे नागरिकांनी पालिकेला सुचवले आहे. मात्र, हे तलाव रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यातील पाणी काढण्यास महापालिकेने स्पष्ट नकार दिला आहे. परिणामी, नालासोपारा शहर यंदाही पावसाच्या पाण्यात बुडण्याचा धोका निर्माण झाला असून यामुळे शहरवासीयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. ५३ अंतर्गत येणाºया नालासोपारा रेल्वेस्थानक ते जिल्हा परिषद शाळा तसेच गावदेवी मंदिर ते आदिराज बिल्डिंग या परिसरात दरवर्षी पाणी तुंबते. त्याचा मोठा फटका निर्माणनगर, अपनानगर, स्नेहानगर, गावदेवी मंदिर व जिल्हा परिषद शाळा या भागांना बसतो. याकडे महापालिका दरवर्षी दुर्लक्ष करत असल्याचा येथील रहिवाशांचा आरोप आहे. याबाबत महापालिकेकडे विचारणा केली असता या भागातील पावसाळापूर्वीची सर्व उपाययोजना केली असून गटारसफाई, व्हीप होल सफाई, क्रॉसिंग सफाई इत्यादी कामे पूर्ण केली आहेत. या परिसरात पावसाचे पाणी साचू नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, अशी माहिती देण्यात आली.
पालिका प्रशासन खोटी माहिती देत आहे. आम्ही सुचवलेल्या कुठल्याही गटारांतील पालिकेने गाळ काढलेला नाही. शिवाय, रेल्वेच्या हद्दीतील तलावांमधील पाणी काढण्यासाठी रेल्वेकडून परवानगी मिळविण्याचे पालिकेने आम्हाला सांगितले आहे. आम्ही परवानगी मिळवून द्यायची, तर मग महापालिकेचा फायदा काय? असा सवाल भाजप युवा सरचिटणीस निलेश राणे यांनी केला. दरम्यान, याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांना पालिका प्रशासनाची बाजू जाणण्यासाठी फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.सर्व नाले साफ करून घेऊ - महापौरच्पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. पालिकेतील अधिकारी काहीही बोलत असले, तरी संपूर्ण नालेसफाईसाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करण्यात येईल.