पालघर : शासनाच्या शिक्षण विभागाकडून १५ जून या शैक्षणिक वर्षापासून शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कुठल्याही सूचना प्राप्त झाल्या नसून आदेश प्राप्त झाल्यास शाळा सुरू करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या शिक्षण विभागाने सरकारी शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेसमधील शिक्षणास बंदी घालत आॅनलाइन शिक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ३१ मेपर्य$ंत असलेले लॉकडाउन पुढे वाढल्यास १५ जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षासंदर्भात शाळा सुरू कराव्यात की नाही, या विवंचनेत शिक्षण विभाग सध्या सापडला आहे.
जिल्ह्यात एकूण ३६४९ जि.प. शाळा असून २१३५ प्राथमिक शाळा आहेत. त्यातील पालघर तालुक्यात ६१२, डहाणू ५६०, जव्हार २७१, मोखाडा १८२, तलासरी २१६, वसई ९६९, विक्रमगड २७५ तर वाडा ३६४ शाळा आहेत. तर माध्यमिक विभागाच्या १५१४ शाळा आहेत. नेहमीप्रमाणे १५ जून या शैक्षणिक वर्षापासून शाळा सुरू होणे अपेक्षित असले तरी शिक्षण विभागाकडून त्याबाबत अजून कुठल्याही सूचना आल्या नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वारभुवन यांनी सांगितले.
पालघर जिल्हा हा ‘रेड झोन’मध्ये आहे. यातील संपूर्ण वसई तालुका ‘रेड झोन’मध्ये असून उर्वरित ७ तालुके ‘नॉन रेड झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या ‘नॉन रेड’ तालुक्यांत बाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि मुंबईमधून आपल्या मूळ गावी परत आलेल्या लोकांना १४ दिवस क्वारंटाइन करण्यासाठी अनेक प्राथमिक, माध्यमिक शाळा वापरण्यास दिल्या आहेत. त्यामुळे १५ जून रोजी शाळा सुरू करण्याचे आदेश आल्यास या शाळा ताब्यात घेऊन त्या निर्जंतुकीकरण करण्याच्या प्रक्रिया शाळा व्यवस्थापनास कराव्या लागणार आहेत.
दुसरीकडे जव्हार, मोखाडा येथील शाळेत येणारा बहुतांशी शिक्षकवर्ग हा नाशिक भागात राहत आहे, तर रेल्वे स्थानकाशेजारच्या शाळेत रुजू झालेले शिक्षक हेही मुंबईमधून शाळेत येत असल्याने परजिल्ह्यातील शिक्षकांना शाळेत येताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी आणि प्रथम क्वारंटाइन व्हावे लागणार आहे.