हुसेन मेमन पालघर : पालघर विधानसभेचे विद्यमान आ. अमित घोडा यांच्या कार्यशैलीमुळे मच्छीमार तसेच इतर समाजात प्रचंड नाराजी असल्याने त्यांची उमेदवारी धोक्यात सापडली आहे. त्यांना पर्याय म्हणून श्रीनिवास वणगा किंवा उच्चशिक्षित असलेल्या डॉ. विश्वास वळवी यांच्या नावाची चर्चा मातोश्रीवर सध्या सुरू आहे. अनेक भागात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत डॉ. वळवी यांचे बॅनर झळकू लागल्याने शिवसैनिकांची त्यांना पसंती असल्याचे दिसून येत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या खा. राजेंद्र गावितांना पालघर विधानसभेने १ लाख ११ हजार ७९४ हजार इतके भरभक्कम मताधिक्य दिले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराला विजयाच्या समीप पोहचण्यास विशेष अडचण भासणार नाही, असे चित्र आहे. मात्र, विद्यमान आ. अमित घोडा यांनी आपल्या मतदार संघात काम करताना वापरलेला निधी हा आपल्या चारोटी, कासा, डहाणू भागात जास्त खर्च करून त्या निधीचे ठेकेही आपल्या जवळच्या नातेवाईकांनाच दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. चारोटी, कासा, डहाणू आदी भागातील अनेक वर्षांपासून सेनेसोबत असलेल्या मच्छीमार समाजाबाबत आ. घोडा यांनी दुजाभाव ठेवल्याने हा समाज त्यांच्यावर नाराज असल्याचे एका कट्टर शिवसैनिकाने नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले. त्यामुळे आ. घोडा यांच्या मुंबई, ठाण्याच्या वाºया वाढल्या आहेत.
माजी खा. चिंतामण वणगा यांच्या अकस्मात मृत्यूने पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत सेनेने त्यांच्या मुलाला, श्रीनिवासला उमेदवारी देत भाजपपुढे आव्हान उभे केले. मात्र, त्या आव्हानाला मुख्यमंत्र्यांनी राजेंद्र गावितांना तिकीट देत तसेच विजयी करून चोख उत्तर दिले होते. त्यामुळे सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे श्रीनिवासच्या पुनर्वसनाचा यक्षप्रश्न उभा राहिला होता. २०१९ च्या पालघर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत हा मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला असूनही शिवसेनेने हा मतदारसंघ मागून घेतला. त्यामुळे श्रीनिवासला उमेदवार घोषित करून त्याच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटेल असे वाटत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपचे विजयी राजेंद्र गावित यांनाच सेनेत प्रवेश देत त्यांना जिंकूनही आणले.
जिल्ह्यात स्थानिक पातळीवर खूप काम करून नंतरच लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा असल्याचे आपणास श्रीनिवासने सांगितल्याचे उद्गार उद्धव ठाकरे यांनी लोकसभेदरम्यान एका भाषणात काढले होते. अशावेळी राजकारणातले स्वत:चे स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने लोकसभा क्षेत्रात विकासात्मक कामे करून आपले कर्तृत्व दाखविण्याची संधी त्यांनी गमावली आहे.सहानुभूतीच्या लाटेचा फायदा झाला नाही?राजकीय कार्यक्र माच्या व्यासपीठावरील आपली उपस्थिती दाखविण्याव्यतिरिक्त श्रीनिवास काही विशेष करू शकले नसल्याचे दिसून आले आहे. व्यासपीठासह मतदार संघात एक मौनी व्यक्तीमत्व अशीच त्यांची प्रतिमा आजपर्यंत राहिलेली आहे. आपल्या कार्यक्षेत्रात विकासकामे करून दाखवण्याची संधी त्यांनी गमावल्याची चर्चा मतदारसंघात होते आहे.सहानभूतीच्या लाटेवर उभ्या असलेल्या श्रीनिवास यांना आजही मतदारसंघावर आपली छाप सोडता आली नसल्याने ‘मौनी’ भूमिकेत वावरणारा उमेदवार आम्हाला नको, अशी मागणी शिवसैनिकांमधूनच होताना दिसते आहे. त्यामुळेच उच्च शिक्षित असलेले डॉ.वळवी यांना शिवसैनिकामधून पसंती मिळत असल्याने त्यांचे बॅनर पालघर मतदार संघात झळकू लागले आहेत.