पालघर : पालघर विधानसभा मतदार संघात प्रचार अंतिम टप्प्यात आला असला तरी शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात डहाणू प्राधिकरण हटवणे आणि वाढवण बंदरा विरोधातील तरुणांनी स्वयंस्फूर्तीने उगारलेले मतदानाविरोधातील बहिष्काराचे अस्त्र सेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांचे मताधिक्य घटवू शकते. मासेमारी हद्द, पर्ससीन-एलईडी, मच्छीमारांच्या घरांच्या जमिनीचे सातबारे, एमआयडीसीच्या प्रदूषित पाण्याची पाईपलाईन, पानेरी प्रदूषण, आदी प्रमुख मुद्द्यांवर विरोधी उमेदवार सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचारात आक्रमक बनत आहेत. या मतदारसंघात पाच उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी खरी लढत सेनेचे श्रीनिवास वनगा आणि काँग्रेस किंवा वंचित बहुजन आघाडी उमेदवारा मध्येच होणार आहे.
पालघरमध्ये विद्यमान आमदार अमित घोडा यांना डच्चू देत शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगून अमित घोडा यांनी बंडखोरी करीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारीला बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी दिलेल्या ताकदीने सेनेच्या गटात अस्वस्थता पसरली होती. त्यामुळे घोडा यांना ठाणे, मातोश्री अशी वारी करून आणल्यानंतर घोडा यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती. या उमेदवारी मागे घेण्याच्या नाट्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अमित घोडा यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी मी घेईन, त्याने माझ्याकडे काही मागितली नाही पण मी त्याला काहीतरी नक्कीच देईन असे सांगुन त्याची बंडखोरी शमवून टाकली आहे. त्यामुळे त्याने श्रीनिवास च्या प्रचाराला सुरु वातही केली आहे. या विधानसभेत सेनेचे ४ जिल्हा परिषद सदस्य तर ८ पंचायत समिती सदस्यांची ताकद ही श्रीनिवास वणगा ची जमेची बाजू असून येत्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाºया जिल्हापरिषद निवडणुकीच्या दृष्टीने आता जमणारी मतांची रसद उपयोगी ठरणारी असल्याने सर्व सदस्य जीव ओतून कामाला लागले आहेत.
काँग्रेस चे उमेदवार योगेश नम हे निवडणुकीच्या रिंगणात असले तरी काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून राजेंद्र गावितांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र केल्यानंतर काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचे डिपॉझटिही जप्त झाल्याने त्या धक्क्यातून या पक्षाला उभारी देण्यासाठी तेवढ्या ताकदीचा सेनापती दिसत नाही. तसेच विधानसभेमधील मतदारांच्या संपर्कात किंवा जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण प्रश्नासंदर्भातील आंदोलनात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी दिसून येत नसल्याने तुल्यबळ समजल्या जाणार्या श्रीनिवास वनगा यांना काँग्रेस उमेदवाराकडून मोठा धोका नाही. तर वंचित आघाडीच्या उमेदवारांनी सेनेवर नाराज असलेला मतदार आपल्या जवळ खेचण्याचे प्रयत्न त्यांना दोन नंबर वर नेऊ शकतो.मनसेचे वारू भरकटलेले तर बसपाचा उमेदवार नवखाच्पालघर विधानसभा क्षेत्राचा विस्तार थेट डहाणू तालुक्यातील कासा ते पालघर तालुक्याच्या केळवे गावापर्यंत विस्तारलेला असल्याने या भागातील गाव-पाडे पायाखाली घालताना पाचही उमेदवाराची पुरती दमछाक होत आहे. सेनेकडे कार्यकर्त्यांची - पदाधिकाऱ्यांची मोठी फळी प्रत्येक गावात असल्याने त्यांच्याकडून प्रचार रॅली, चौक सभा,मोटारसायकल रॅली, प्रचार सभा घेतल्या जात आहेत.च्त्यांच्या प्रचारासाठी सेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, खा. राजेंद्र गावित, आ.रवींद्र फाटक आदी दिग्गजांची फौज उतरली आहे. तर अन्य काही उमेदवारामध्ये मनसेचे उमेश गोवारी रिंगणात असले तरी त्यांचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी सेनेत प्रवेश केल्याने मनसेचे वारू भरकटलेल्या अवस्थेत आहे. तर बहुजन समाज पार्टीचा उमेदवार मतदारसंघासाठी नवखा आहे.