बोर्डी : पालघर जिल्ह्यातील युवक नोकरीनिमित्त मुंबई आणि उपनगरांत जातात. मात्र, कंपन्या बंद असल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारी ओढवली आहे. या युवकांनी शेतीमध्ये व्यवसायाच्या संधी शोधाव्यात. त्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे, असे आवाहन पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी कृषीदिनानिमित्त बुधवारी केले. तसेच चिकू पुनरुज्जीवन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी आणि कृषी विज्ञान केंद्रात जैविक कीडनाशक बनवणारी प्रयोगशाळा उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
डहाणू पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि कृषी विज्ञान केंद्र कोसबाड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्र माचे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती स्नेहलता सातवी या होत्या. आमदार वनगा म्हणाले की, शेती करून इतरांसाठीही रोजगार निर्मिती करू शकतो. दुप्पट उत्पन्नासाठी आधुनिक शेती आवश्यक असल्याचे सांगून एकात्मिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.
कार्यक्रमास उपस्थित शेतकऱ्यांना भातलागवड तंत्रज्ञान आणि पीक संरक्षण याविषयी अनुक्रमे केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव आणि उत्तम सहाणे यांनी सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी कृषी केंद्राच्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली. गटविकास अधिकारी बी.एच. भरक्षे यांनी कोरोना पाशर््वभूमीवर काळजी घेण्याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. तर पंचायत समिती उपसभापती पिंटू गहला, उद्यान पंडित विनायक बारी यांनी मार्गदर्शन केले. लॉकडाऊन कालावधीत उत्पादक ते थेट ग्राहक योजनेंतर्गत शेतकरी गटांनी महापालिका क्षेत्रात भाजीपाला विक्र ी केली. या गटांचा आमदार वनगा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पंचायत समितीचे कृषी अधिकारी विभूती पाटील, कृषीविज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि निवडक शेतकरी उपस्थित होते.