अजित मांडके, ठाणेठाणे महापालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीच्या लगीनघाईत घोडबंदर भागातील तुर्फेपाडा तलावाच्या ठिकाणी उद्यान उभारण्याच्या कामाचा शुभारंभ झाला होता. यासाठी एक कोटींचा खर्च करुन येथे संरक्षक भिंतीसह जॉगींग ट्रॅक उभारला होता. परंतु, त्यानंतर या उद्यानाची एक विटही पाच वर्षानंतर हलू शकलेली नाही. त्यामुळेच तयार कलेला जॉगींग ट्रॅक चक्क गायब झाला असून संरक्षक भिंतदेखील काही ठिकाणी तोडली गेली आहे. त्यातही येथे असलेला तलावदेखील हळूहळू बुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे नजिकच्या भविष्यात येथे तलाव होता, अशी म्हणण्याची वेळ येथील स्थानिकांवर येण्याची शक्यता आहे.ठाणे महापालिका हद्दीत ६५ पैकी ३५ तलाव शिल्लक असून त्यातही केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील, अशाच तलावांवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. परंतु, दुसरीकडे काही तलावांच्या दुरुस्तीकडे किंवा सुशोभिकरणाकडे पालिकेकडे निधीच नसल्याचे दिसून येत आहे. घोडबंदर भागातील तुर्फेपाडा तलाव हा त्यातीलच एक म्हणावा लागणार आहे. तुर्फेपाडा भागात हा तलाव असून त्याच्या आजूबाजूला विस्तीर्ण जागा आहे. परंतु, आज ही जागा मद्यपींचा अड्डा झाली आहे. एकीकडे स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा करून हगणदारीमुक्तीसाठी पालिकेने पावलेही उचलली आहेत. परंतु, या भागात जर गेलात तर या ठिकाणी तलावाच्या चोहोबाजूने सकाळ, संध्याकाळ शौचास बसलेल्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यात याच तलावात धुणी, भांडी धुण्यात येत असल्याने तलावातील पाणी दूषित होत आहे. त्यातही तलावाच्या आजूबाजूला एवढी झाडीझुडपे वाढली आहेत की, त्यामुळे संपूर्ण तलावाच झाकला गेला आहे.२०१२ च्या निवडणुकीच्या आधी या तलावाच्या ठिकाणी उद्यान बनविण्याचा घाट घातला गेला. त्यानुसार सत्ताधारी नेत्यांनी या उद्यानाच्या कामाचा शुभारंभ करून कामदेखील सुरू झाले. पहिल्या टप्यात येथे संरक्षक भिंत आणि जॉगींग ट्रॅक उभारण्यात आला. परंतु, या जॉगींग ट्रॅकचा लाभ किती रहिवाशांनी घेतला याचे उत्तर मात्र अनुत्तरीतच आहे. आज हा जॉगींग ट्रॅक गायब झाला असून संरक्षक भिंतदेखील तुटली असून आता ही जागाच बळकावण्याचा घाट भूमाफियांनी घातल्याचे दिसत आहे. ंतलावाच्या आजूबाजूला हगणदारी आणि सांयकाळी मद्यपींचा पडलेला गराडा त्यामुळे हा तलाव असून अडचण तर नसून खोळंबा ठरत आहे.या तलावाच्या कामासाठी कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी सुमारे दोन कोटींचा निधी मंजूर केला होता. परंतु, शासनाकडून येणारा हा निधी तुकड्या तुकड्याने येणार असल्याने आधी जसा खर्च पाण्यात गेला तसा हा खर्च पुन्हादेखील वाया जाऊ शकतो, अशी भिती व्यक्त करून स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी हा निधी स्थगित ठेवला आहे. तर दुसरीकडे पालिकेनेदेखील या तलावाचे सुशोभिकरण आणि थीम पार्क विकसित करण्याचा आराखडा तयार केला आहे.
तुर्फेपाडा तलाव नामशेष होणार ?
By admin | Published: March 15, 2017 1:49 AM