वसई : वसई-विरार शहरामध्ये मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता; मात्र आता पुन्हा बाधित रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने शहराची चिंता वाढू लागली आहे. यामुळे वसई-विरार शहर महापालिकेची तिसरी सार्वत्रिक निवडणूक डिसेंबरपर्यंत न होता आणखी काही काळ म्हणजे एप्रिल-मेपर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महापालिका प्रशासन सध्या केवळ कोरोनावरच लक्ष केंद्रित करत असून विकासकामांसह नागरी प्रश्नांवर त्याचा परिणाम होत आहे. यामुळे नागरिक तसेच राजकीय पक्षांत नाराजी आहे. त्यामुळे कधी एकदा प्रशासक कालावधी संपतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जोपर्यंत निवडणुका होऊन लोकप्रतिनिधींमार्फत कारभार सुरू होत नाही, तोपर्यंत वसई-विरार पालिकेच्या कारभाराची सूत्रे आयुक्त तथा प्रशासक अशा दुहेरी भूमिकेत असलेल्या गंगाथरन डी. यांच्याच हाती असणार आहेत.वसई-विरार महापालिकेची मुदत दि. २८ जून २०२० रोजी संपत असताना त्यास मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी सत्ताधारी वर्गाने मागणी केली होती, मात्र राज्य शासनाने ती फेटाळून लावत दोन महिने आधीच आयुक्त व प्रशासकाची नियुक्ती केली. शिवसेना नेते, नगरविकास मंत्र्यांनी बविआला ‘दे धक्का’ देण्यासाठी पालिकेचे आयुक्त म्हणून गंगाथरन डी. यांची नियुक्ती केली गेली आणि काही दिवसातच त्यांनाच प्रशासकही नेमले.दरम्यान, पालिकेच्या मुख्यालयात प्रारूप रचनांवर हरकती व सूचनांसंदर्भात सुनावणी घेण्यात आली. यात १७ पैकी एकच हरकत मान्य करत ती निवडणूक आयोगापुढे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.शहरात रुग्णसंख्या २२ हजारांच्या पुढे, ४४४ जणांचा मृत्यूवसई-विरार महापालिकेवरील प्रशासक-राज डिसेंबरमध्ये संपत असल्याने कदाचित जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२१ मध्ये महापालिकेची निवडणूक होण्याचे संकेत मिळत असले तरी पालिका हद्दीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ती पुढे ढकलली जाण्याचे संकेत मिळत आहेत.आतापर्यंत कोरोनाबधितांचा आकडा २२ हजारांच्या पुढे गेला आहे, तर ४४४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस वाढणारा कोरोनाचा पादुर्भाव पाहता पुढील वर्षी जानेवारी महिन्यात निवडणुका होतील की नाही याबाबत साशंकता आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेची निवडणूक येत्या जानेवारीऐवजी आणखी चार महिने लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचे मत वसईतील राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.