मीरा रोड : भाड्याने घर मिळवून देण्यासाठी ३८ जणांकडून मोठी अनामत रक्कम घेऊन ती परस्पर लाटणारा मीरा रोडमधील इस्टेट एजंट कुटुंबासह पसार झाला आहे. एक कोटी ८१ लाखांना गंडा घालणारा हा एजंट गुन्हा दाखल होऊन महिना व्हायला आला, तरी काशिमीरा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
काहींनी रोखीने पैसे दिले असून पैसे दिल्याचा पुरावा नसल्याने ते तक्रारीसाठी पुढे आलेले नाहीत. त्यांची रक्कम धरल्यास पाच कोटींच्या घरात फसवणूक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पळून जाण्याआधी त्याने आत्महत्या करत असून पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी कुटुंबीयांचे रक्षण करावे, असे चिठ्ठीत लिहिले आहे. मीरा रोडच्या झंकार कंपनीजवळील विनयनगरमध्ये असलेल्या शीतल कॉम्प्लेक्समध्ये हार्दिक ऊर्फ राज मुक्तिलाल शेठ हा पत्नी व मुलीसोबत भाड्याने राहायला आला. येथे त्याने स्वत:ची सर्व कागदपत्रे तयार करून राज इस्टेट नावाने इस्टेट एजन्सीचा व्यवसाय सुरू केला. मोठी अनामत रक्कम घेऊन बिनभाड्याची सदनिका या परिसरात तो नागरिकांना घेऊन देत असे. स्वत:ला धार्मिक दाखवत असल्याने नागरिकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. मोठी अनामत रक्कम घेऊन तो भाडेकरूला मात्र घरमालकास तसे सांगू नका, असे बोलायचा. घरमालकासोबत भाडेकरूचा भाडेकरार करायचा व स्वत:सोबत तो भाडेकरूचा मोठ्या अनामत रकमेचा वेगळा करारनामा करायचा. अशा प्रकारे त्याने अनेकांकडून काही कोटी रुपये गोळा केले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार लाखांपासून ३० लाखांपर्यंतची रक्कम त्याने उकळली आहे. अनेकांनी तर रोखीने व्यवहार केल्याने पोलीस पुरावा मागत असल्याने रोखीने पैसे देऊन फसलेले कुणी पुढे येण्यास तयार नाहीत. वास्तविक, नोव्हेंबरअखेरीस हार्दिक हा कुटुंबासह रातोरात पसार झाला. त्याचे कार्यालयही बंद आढळल्याने अनामत रकमेसाठी मोठी रक्कम दिलेले एकत्र आले. ४० जणांनी काशिमीरा पोलीस ठाणे गाठले. पण, पोलिसांनी त्यावेळी गुन्हा दाखल करून न घेता केवळ अर्जच घेतला.पळून जाण्याआधी हार्दिकने आत्महत्या करत असल्याची दोन पानांची गुजराती भाषेत चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीत त्याने वैभव शिंगारे यांनी आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे, तसेच आपल्या आत्महत्येस काही जणांची नावे लिहून ते जबाबदार असल्याचे नमूद केले. नागरिकांचा वाढता तगादा पाहता अखेर पीयूष कांतिलाल दरजी यांनी दिलेल्या तक्रार अर्जाच्या आधारे गुन्हा दाखल केला. आतापर्यंत दरजीसह एकूण ३८ जणांनी घर भाड्याने देण्यासाठी मोठी अनामत रक्कम घेऊन हार्दिकने आपली फसवणूक केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. धनादेशाने दिलेली रक्कम एक कोटी ८१ लाख इतकी आहे. पण, रोखीने घेतलेली रक्कमही मोठी आहे.सुरतला त्याचे आईवडील राहत असून त्यांच्याकडे चौकशी केली असता आपला मुलगा फसवणुकीचे व्यवसाय करत असल्याने त्याच्याशी संबंध ठेवला नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्याची एक गाडी फसलेल्या नागरिकांनीच पोलिसांना पकडून दिली, तर दुसरी गाडीसुद्धा शहरात दिसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.फसवणूक झालेले दुहेरी कात्रीतहार्दिकने मोठी अनामत रक्कम घेऊन अनेकांना लाखोंचा चुना लावला असतानाच आता घराचे भाडे मिळाले नाही, म्हणून घरमालकांनीही भाड्यासाठी तगादा लावला आहे. भाडे भरा, अन्यथा घरे रिकामी करा, असे सांगितले जात आहे. त्यामुळे फसवणूक झालेले दुहेरी कात्रीत सापडले आहेत.हार्दिक सेठ हा सराईत चीटर आहे . नागरिकांना फसवून तो कुटुंबासह पळून गेला आहे. आत्महत्येची चिठ्टी आणि त्यातील नावे आदी दिशाभूल करण्यासाठी लिहीली आहेत. त्याचा शोध सुरु असून लवकरच अटक करू.- वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक