नालासोपारा/वसई : पतीने मारले म्हणून तक्रार करायला माणिकपूर पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेने पतीला शिविगाळ करून मारहाण करू लागल्यावर तिला त्याच्यापासून दूर केल्याचा राग मनात धरून एका महिला पोलीस शिपाईचे केस खेचून तिच्या हाताला नखांनी ओरबाडून शिविगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. जखमी पोलीस महिलेने माणिकपूर पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरोधात तक्रार दिल्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
वसई पश्चिमेकडील अंबाडी रोडवरील परिसरात राहणारी आरोपी महिला परमिता शौमिक देशमुख-ढोले (४४) यांना त्यांचे पती शौमिक ढोले यांनी मारहाण केली म्हणून माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या व त्यांचे पतीही पोलीस ठाण्यात हजर होते. त्यांना पाहून आरोपी महिलेने पोलीस ठाण्यात शिविगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या वेळी तिथे हजर असणाऱ्या महिला पोलीस शिपाई सुप्रिया तानाजी पाटील (२५) यांनी त्या महिलेला त्यांच्यापासून दूर केल्याचा राग मनात ठेवून त्यांनी सुप्रिया यांच्यावर हल्ला करत केस पकडून जोरात खेचून नखांनी ओरबाडून शिविगाळ व धक्काबुक्की केली. त्यांच्या मदतीला आलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक डोके व महिला पोलीस शिपाई कदम यांना देखील शिविगाळ करून डोके यांच्या पोटात लाथ मारली.सरकारी कामात अडथळाच्पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, उपनिरीक्षक भागवत, ठाणे अंमलदार ताकवाले, पोलीस शिपाई आव्हाड यांना सुद्धा शिविगाळी व दमदाटी करून पोलीस निरीक्षकांच्या अंगावर धावून गेली. सरकारी कामात अडथळा केला म्हणून आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.