लोकमत न्यूज नेटवर्क विक्रमगड : स्वतंत्र विक्रमगड तालुका स्थापन करण्यात आल्यापासून अनेक समस्या जनतेला भेडसावत आहेत, मात्र शासन या समस्या सोडविण्यासाठी कुठे तरी कमी पडत आहे. विक्रमगड तालुक्यातील अनेक पक्ष, संघटनांनी विविध समस्या, प्रश्न घेऊन मोर्चे, आंदोलने केली, मात्र समस्या सुटत नाहीत. यामुळे आता विक्रमगड तालुक्यातील महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी सोमवारी विक्रमगड पंचायत समितीवर धडक दिली.
अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने पुढाकार घेऊन तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी विक्रमगड पंचायत समितीवर सोमवारी धडक मोर्चा काढला. या आंदोलनात विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महिला येणार असतानाच आंदोलनकर्त्यांना गेटवर अडवण्यात आले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. नंतर शिष्टमंडळाला बोलावण्यात आले. खावटी योजनेचा लाभ गरजू कुटुंबांना देण्यात यावा, आरोग्य उपकेंद्राच्या सुविधेत सुधारणा करण्यात यावी, रेशनिंग समस्या व विभक्त रेशनकार्डधारकाला धान्य मिळावे, संजय गांधी निराधार योजनेची काटेकोर अंमलबजावणी करणे आणि गरजूंना लाभ मिळावा, रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त कामे काढावी, तालुक्यातील पाणीटंचाई दूर करावी, ग्रामीण भागातील अनेक रस्ते नादुरुस्त व रस्ते नसलेल्या गावपाड्यात रस्ते बनवावे, विद्युत समस्या व जास्तीची वीजबिल आकारणी करून चाललेली जनतेची लूट थांबवण्यात यावी, महिलांची सुरक्षा, डोल्हारी खुर्द व पोचाडा अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी समस्या, घरोघरी शौचालये योजनेतून उपलब्ध व्हावीत, घरकुल योजनेतून गरजूंना लाभ मिळावा व रद्द झालेली घरकुले मंजूर करण्यात यावी, तालुक्यातील कुर्झे येथील बेकायदेशीर सुरू असलेला मूण ॲग्रो कत्तलखाना बंद करणे, जांभा ग्रामपंचायत कार्यालय हे जांभा गावठाणातच बांधण्यात यावे आदी विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
या वेळी अखिल भारतीय जनवादी महिला संघटना महाराष्ट्र राज्य सचिव प्राची हातीवळीकर, जिल्हा सचिव लहानू दौडा, जिल्हा खजिनदार सविता शिंगडा, विक्रमगड तालुका अध्यक्ष सुंदर काकड, तालुका सचिव गिरजी कानल, महिला कार्यकर्त्या ताई बेंदर व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विक्रमगड तालुका सचिव किरण गहला, माकपा जि. सदस्य राजा गहला, विलास गहला, टोलुराम चौधरी, चिंतू कानल आदी उपस्थित होते.