राहुल वाडेकर
विक्रमगड : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊ न लागू झाल्यापासून सर्वच क्षेत्रांत आर्थिक संकट ओढवले आहे. या कठीण परिस्थितीत पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील नऊ गावांतील सुमारे ३०० आदिवासी महिलांनी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर बांबूपासून ५० हजार पर्यावरणपूरक राख्या बनवण्याचे लक्ष्य ठेवले असून यातून त्यांना रोजगार मिळणार आहे. केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून त्यांना बांबूपासून विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून या महिलांनी बनवलेल्या राख्यांना आॅनलाइन बाजारपेठही उपलब्ध केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन व सध्या चीनसोबतच्या बिघडत्या संबंधांमुळे स्वदेशी वस्तूंची पर्यायी बाजारपेठ निर्माण करून चिनी वस्तूंना तोडीसतोड उत्तर देण्यासाठी ग्रामीण भागातील महिला एकवटल्या आहेत. आगामी रक्षाबंधन सणासाठी बाजारपेठेत विक्र ीसाठी येणाऱ्या चिनी राख्यांना टक्कर देण्यासाठी या महिलांनी बांबूपासून पर्यावरणपूरक अशा ५० हजार स्वदेशी राख्या बनवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्प या संस्थेच्या माध्यमातून त्यांना साहित्य उपलब्ध करून दिले जाते. कोरोनाच्या लॉकडाऊन काळातही एकमेकींपासून सुरक्षित अंतर ठेवून मास्कचा वापर करून या महिला दिवसरात्र झटत आहेत. तसेच आगामी काळात येणाºया गणपती-नवरात्र आणि दिवाळी सणांसाठी लागणारी आकर्षक मखरे आणि आकाशकंदीलही बांबूपासून साकारण्याचा त्यांचा निर्धार आहे.महिला सक्षमीकरणवाडा, विक्रमगड, जव्हार या तालुक्यांतील दुर्गम आदिवासी भागात विविध सेवाभावी प्रकल्प राबवले जात आहेत. यामध्ये महिला सक्षमीकरण, वृक्षलागवड, सेंद्रिय शेती ही ध्येये समोर ठेवण्यात आली आहेत. याकामी प्रकल्पाचे प्रमुख विमल केडिया, संयोजक अरविंद मारडीकर, गौरव श्रीवास्तव, संतोष गायकवाड हे परिश्रम घेत आहेत.