हुसेन मेमन / जव्हारजव्हार शहरात दि. २१ एप्रिल पासून पालिका पोटनिवडणूकीची आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे सर्व विकासकामे ठप्प झाली आहेत. जव्हार नगर परिषदेने नुकतेच दलितवस्ती सुधार योजना, रस्ता निधी व जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महाराष्ट्र नगरोत्थान अभियानअंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करणे, पेव्हर ब्लॉक बसवीणे, शॉपींग सेटर बनविणे, गटारे बांधणे, संरक्षक भिंत बांधणे, कॉँक्रीटचे रस्ते तयार करणे अशा कामांकरीता करोडो रूपये शासनाकडून प्राप्त झाले असून त्यांच्या ई-निविदाही प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच ही सर्व कामे बांधकामाला व रस्ता डांबरीकरणाला अनुसरून आहेत आणि शासन नियमानुसार २० मे नंतर अशी कामे न करण्याचा नियम करण्यात आलेला आहे, त्यामुळे ही सर्व विकास कामे आता आणखी लांबणीवर पडणार आहेत. कधी नव्हे इतक्या मोठ्याप्रमाणात शासनाकडून आलेला निधी व समोर येत असलेला पावसाळा यामुळे जव्हारचा विकास होण्यास मदत होणार होती, मात्र गेल्या काही वर्षापासून नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यातला वाद चव्हाट्यावर आल्यामुळे जणू शहराच्या विकासाला साडेसातीच लागली आहे. आचार संहिता निवडणूकी नंतरच म्हणजेच मे अखेर संपणार असल्यामुळे ही कामे पावसाळ्यानंतरच होणार आहेत, मात्र शहरात पाचबत्ती ते आझाद चौक तर आदिवासी भवन ते नगर पालिका शाळेपर्यत जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झालेली असल्यामुळे किमान ते तरी काम आधी व्हायला हवे होते. परंतु आता ते ही शक्य नाही. (वार्ताहर)रस्त्याचे डांबरीकरण करणे, गटार बांधणे, पेव्हर ब्लॉक बसविणे अशा विविध कामांच्या निविदा प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत, मात्र पूर्ण मे महिंन्यात आचार संहिता असल्यामुळे या निविदा प्रक्रिया पूर्ण करता येणार नाहीत, त्यामुळे रस्त्यांची व इतर कामेही पावसाळ्यानंतरच करता येतील, तसेच निविदांना बॉडीची मंजुरीही घ्यावी लागते त्यामुळे जो पर्यत बॉडी अस्तित्वात येत नाही तो पर्यत काहीच करता येणार नाही.-वैभव विधाते, मुख्याधिकारी नगर परिषद, जव्हार
आचारसंहितेमुळे कामे रखडली
By admin | Published: May 01, 2017 5:45 AM