विक्रमगड: तालुक्यामध्ये ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमताने कोटयावधी रुपयांचा भ्रष्टाचार विकास कामांमध्ये केला आहे. रस्त्याची व इमारतींची कामे न करताच बोगस कागदपत्रे बनवुन बिले काढली आहेत. एकाच रस्त्याचे चार - चार वेळा बिल काढूनही रस्ते अपूर्णच आहेत. याची चौकशी व्हावी या मागणीसाठी सहा आदिवासी तरूणांनी आपले उपोषण जारी ठेवले आहे. आश्वासने नकोत मागणी मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला असून अभियंत्यांनी केलेली उपोषण संपविण्याची विनंती फेटाळून लावली आहे. राजरोस होणाऱ्या भ्रष्टाचाराला वैतागलेल्या विक्रमगड तालुक्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरूणांनी सार्वजनीक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर दि. २४ मार्च पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. मात्र ठोस आश्वासन न मिळाल्याने हे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच असून उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालल्याने आदिवासी बांधव संतापले आहेत. त्यामुळे हे आंदोलन आता चिघळण्याची चिन्हे आहेत. विक्रमगड तालुक्यामध्ये पीडब्ल्यूडी मार्फत झालेल्या सर्व विकास कामांची विशेष तपास पथका मार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी संतोष जेठया खांजोडे (खोस्ते), मनोज सदानंद खरपडे (विक्रमगड), बंधू काशीराम थोरात (वसुरी), प्रमोद विश्वनाथ पाटील (आपटी), विलास सुकऱ्या घाटाळ (केव) व संजय आलो पराड (बांधण) या सहा तरु णांनी उपोषण सुरु केले आहे. दि. २४ मार्च रोजी पीडब्ल्यूडी चे उपअभियंता दिनेश होले यांनी तर दि. २५ मार्च रोजी कार्यकारी अभियंता राहुल वसईकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख परेश रोडगे, शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, तालुकाप्रमुख राजाभाई जाधव, इंदिरा काँग्रेसचे सरचिटणीस विश्वनाथ पाटील, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेकभाऊ पंडीत यांच्यासह अन्य पक्षाच्या व सामाजीक संस्थांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठींबा दर्शवला आहे. (वार्ताहर)
सा.बां.च्या कामांची चौकशी व्हायलाच हवी
By admin | Published: March 27, 2017 5:27 AM