वाडा : तालुक्यातील मुसारणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या चारमिनार या कंपनीत कंपनी व्यवस्थापन व श्रमजीवी कामगार संघटना यांच्यात करार झाला असून या करारात भरघोस पगारवाढ झाली आहे. त्यामुळे कामगारांनी साखर वाटून जल्लोषात या पगारवाढीचे स्वागत केले आहे.
मुसारणे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत चारमिनार ही कंपनी असून या कंपनीत छतावरील पत्र्यांचे उत्पादन केले जाते. गेली सोळा वर्ष या कंपनीत श्रमजीवी कामगार संघटनेची संघटना आहे. या कंपनीत कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात २० जुलै रोजी करार झाला असून या करारात ११ हजार ६०० रूपयांची भरघोस पगारवाढ झाली आहे. दुसरा स्लॅब जो पाच वर्षा खालील कामगारांना ५ हजार ६०० ची पगारवाढ झाली आहे.
भरघोस पगारवाढ मिळवून देण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यमंत्री विवेक पंडित, संघटनेचे उपाध्यक्ष विजय जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले. वाडा तालुक्यात अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या असून एवढी मोठी पगारवाढ तालुक्यात प्रथमच झाली असल्याचे श्रमजीवी कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष रवींद्र चौधरी, उपाध्यक्ष राजू जाधव यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.