वसई : श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणात गेले काही दिवस दिल्ली आणि माणिकपूर पोलिस सातत्याने वेगवेगळ्या अँगलने तपास करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून श्रद्धाने ज्या दंत चिकित्सक डॉक्टरकडून उपचार करून घेतले होते, त्यांचाही जबाब नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, श्रद्धाच्या दातांचा एक्स-रे या प्रकरणात महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दिल्ली पोलिस आणि माणिकपूर पोलिसांच्या पथकाने गुरुवारी श्रद्धा हिच्यावर उपचार केलेल्या डॉ. ईशान मोटा यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. श्रद्धा हिने डॉ. मोटा यांच्या क्लिनिकमध्ये अनेकवेळा येऊन रुट कॅनल करून घेतले होते. २०२१ मध्ये तिने डॉ. मोटा यांच्याकडून आपल्या दातांवर ट्रीटमेंट करून घेतली होती. यासाठी ती जवळपास आठ वेळा त्यांच्या क्लिनिकमध्ये गेली होती. त्यावेळी तिने एक्स-रे आणि इतर बिलांचे पैसे आपल्या क्रेडिट कार्डचा वापर करून दिले होते. याबाबतचा एक्स-रे आणि इतर ट्रीटमेंटचा फायदा चौकशीच्या कामी होणार आहे. दिल्ली पोलिसांना जंगलात आढळलेल्या जबडा हा श्रद्धा हिचाच आहे का, याचा तपास यावरून होऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.