हुसेन मेमन जव्हार : तालुक्याचा दहावीचा ८९.०४ टक्के निकाल लागला असून, १ हजार ८७७ विद्यार्थी पास झाले आहेत. मात्र तालुक्यात ११ वी प्रवेशाच्या जागा अवघ्या ५५० आहेत. त्यामुळे यावर्षीही अकरावी प्रवेशाच्या जागा कमी असल्याने कमी टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजला अथवा इतर ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. परणामी ११ वी प्रवेशाची समस्या यावर्षीही उद्भवणार आहे. त्यामुळे तेराशे विद्यार्थ्यांवर प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येणार कि काय? अशी भीती पालक व विद्यार्थ्यांना भेडसावते आहे.जव्हार आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत चालविण्यात येणा-या आश्रम शाळा आणि अनुदानित आश्रम शाळा यातून २ हजार एकशे आठ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यातील १ हजार ८७७ विद्यार्थी परीक्षा पास झाले आहेत. तसेच यामध्ये भारती विद्यापीठ हायस्कूल, वडोली हायस्कूल, श्रीजयेश्वर विद्यालय डेंगाचीमेट, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जव्हार, अशा चार शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्याच बरोबर १० आश्रम शाळांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. त्यामुळे ११ वीत प्रवेश मिळेल कि नाही अशी चिंता पालकांना वाटायला लागली आहे.दरम्यान जव्हार शहरात अवघे दोन कॉलेज आहेत तर ११ वी साठी शासकीय आश्रम शाळा विनवळ, देहेरा, दाभोसा, न्याहाळा, अशा ठिकाणी बारावी पर्यंत वर्ग आहेत. तसेच यापैकी काही विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश मिळू शकतो. उर्वरीत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची समस्या यावर्षीही गंभीर आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी जायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला असून, पालकवर्ग चिंताक्रांत झाला आहे.
यावर्षीही ११ वी प्रवेशाची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:04 AM