जव्हार : बहिण भावाच्या स्रेहाचे प्रतिक असणारा रक्षाबंधन हा सण येत्या सोमवारी साजरा होत असून त्यानिमित्ताने जव्हारची बाजारपेठ चांगलीच गजबजली आहे. यंदा चायनिज राख्यांवर देशभक्तीची संक्रात आली आहे. अनेक बहिणींनी भारतीय राख्यांनाच पसंती दिल्याने चीनी राख्या पडून असल्याची माहिती व्यापाºयांकडून देण्यात आली.सध्या भारत चीन मधील ताणलेल्या संबधाचे पडसाद रक्षाबंधनाच्या सणावरही पडले असून शहरातील सुशिक्षित वर्ग भारतीय राख्यांना आवर्जून पसंती देत आहे. लाल गोंडे, सूर्यफुलाच्या राख्यांना आदिवासी महिला पसंती देत असून छोट्या बहिणींनी भीम, डोरेमन आणि कार्टूनच्या राख्यांना पसंती दिली आहे. या निमित्ताने लाडक्या बहिणीला भेट म्हणून नऊवारी व सहावारी साड्यांना पसंती मिळत आहे. तर अनेकांनी जवळच्या नाशिक बाजारपेठेत जाऊन खरेदी केल्याचे दिसून येत आहे.बहीण भावाचे पवित्र नाते कायम रहावे तसेच कठीण प्रसंगात भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावास राखी बांधत असते. जर कुणाला सख्खा भाऊ नसेल तर मानलेल्या भावास राखी बांधली जाते. या सणाची सगळ्याच बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत.आदिवासींनी बनविल्या बांबूपासून राख्यावसई : आदिवासींनी बांबूपासून बनवलेल्या इको फ्रेंडली राख्यांना सध्या वसईत चांगलीच मागणी आहे. भालिवली येथील विवेक रुरल ड्ेव्हलपमेंट संचालित राष्ट्र सेवा समितीच्या आदिवासींनी बनवलेल्या राख्यांची प्रदशने वसईत भरली आहेत. पर्यावरणाचे रक्षण करण्यासोबतच आदिवासींना रोजगार मिळावा यासाठी समितीने आदिवासींना बांबूपासून इको फ्रेंडली राख्या बनवण्याचे प्रशिक्षण दिले होते.त्यानंतर आदिवासींनी विविध रंगांच्या, ढंगांच्या सुरेख राख्या बनवल्या आहेत. सध्या म. ग. परुळेकर शाळा आणि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये राख्यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याला वसईकरांना चांगला प्रतिसाद दिला. आता डी. ए. फॅशन्स, साई मेडिकल रमेदी याठिकाणी राख्या विकण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. तर माणिकपूर येथील सभागृहात शनिवारी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
यंदा चिनी राख्यांवर आली देशभक्तीची संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 1:56 AM