पारोळ : यंदा पावसाने वसई, पालघरच्या उपप्रदेशाला धुवून काढले. पावसाचा यंदा रेकॉर्डब्रेक झाला असून तो तब्बल ३ हजार ८६७ मिमी. इतका बरसला.गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकट्या वसई तालुक्यात सुमारे १ हजार ७२४ मिलीमीटर इतका पाऊस झाला. मुसळधार पावसाने वसईकरांचे अतोनात नुकसान करतानाच ५ जणांचा बळी घेतला. तर दुसरीकडे ग्रामीण भागातील शेतीला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. भातशेतीवर पावसाची अवकृपा झाली असून आणखी काही काळ पाऊस झाला तर भातिपकांवर रोग पसरण्याची भिती व्यक्त होत आहे.दरम्यान, मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ४ लाखांची मदत मिळाली आहे.१ जून ते ३० सप्टेंबर या काळात तब्बल ३ हजार ८६७ मिलीमिटर इतका पाऊस झाला. वसई तालुक्यात सलग चारवेळा पूर परिस्थिती निर्माण झाल्याने नागरी जीवन ठप्प झाले. अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी चारवेळा घुसून शेकडो नागरिकांचे संसार उघड्यावर पडले होते. दरम्यान, वसईतील शेतीला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला.
वसईत यंदा झाला रेकॉर्डब्रेक पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 12:28 AM