मीरारोड - काशी चर्च येथील झोपडपट्टीत बीएसयुपी योजनेअंतर्गत इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यात बुडून एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरातील रहिवाशी संतापले असून येथे लहान मुलं सुध्दा सतत खेळत असतात. पण नगरसेवक आणि पालिकेच्या दुर्लक्षामुळे तरुणाचा बळी गेल्याचा आरोप करण्यात येत आहे.
काँग्रेस आघाडी शासन काळात काशिचर्च व जनतानगर येथील झोपडपटट्टीवासियांचे जिवनमान उंचावण्यासाठी बीएसयुपी योजना अमलात आणण्यात आली. परंतु विविध कारणांनी रखडलेली सदर योजना भाजपा युती शासन काळात रद्द करण्यात आली. त्यासाठी वेगळ्या योजनेचा पर्याय तसेच उपलब्ध २५ टक्के जागा विकून बांधकाम प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
योजना रखडल्याने झोपडपट्टीवासिय मात्र यातना भोगत आहेत. त्यातच काशी चर्च जवळील अशाच एका रखडलेल्या इमारतीच्या भागात खोदलेल्या सुमारे १५ फूट खोल खड्यात पाणी साचले आहे. त्या खड्यात राहुल शर्मा नावाचा १८ वर्षाचा तरुण कचरा वेचण्यास गेला असता पडून बुडाला. मुलाला वाचण्याचा प्रयत्न करताना त्याचे वडील अजय शर्मा देखील बुडू लागले. परंतु रहिवाशांनी त्यांना वेळीच धाव घेऊन वाचवले. तर राहुल याला पालिकेच्या जोशी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे सांगितले.
या भागात स्थानिक रहिवाशांची लहान मुलं खेळत असतात. एखादं मुल खड्ड्यात पडून मृत्युमुखी पडण्याची भिती रहिवाशांना कायमची लागून राहिली आहे. आम्ही सतत पालिका आणि नगरसेवक यांच्याकडे तक्रारी केल्या पण काहीच काळजी घेण्यात आली नसल्याचे रहिवाशी म्हणाले. राहुलच्या मृत्युला महापालिका आणि ठेकेदार जबाबदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील रहिवाशांनी बोलून दाखवली. तर या प्रकरणी ६ महिन्यांपूर्वी महापालिकेला लेखी तक्रार करुन देखील ठेकेदार आणि पालिकेने गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे श्रमजीवी कामगारा संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल म्हणाले.