- आशिष राणे
वसई : वसईतील २५ वर्षीय तरुणाने कोरोनावर मात केल्यानंतर जगातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एव्हरेस्ट’ सर करण्याची कामगिरी बजावली आहे. या संपूर्ण मोहिमेत लागणारे साहित्यही इकोफ्रेंडली स्वरूपाचे होते.पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील नवघर माणिकपूर शहरांतील दिवाणमान येथील हर्षवर्धन जोशी याने ऐन कोविड-१९च्या महामारीत ही धाडसी कामगिरी करून दाखवत भारतमातेच्या झेंड्यासोबत वसई-विरार शहर महानगरपालिकेचा झेंडादेखील माऊंट एव्हरेस्ट शिखरावर फडकविला आहे. हर्षवर्धन जोशी हा आयटी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असून या मोहिमेत त्याला कोविडने ग्रासले असताना त्यावर मात करून त्याने ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली आहे. यामुळे वसईकरांनी व खासकरून दिवाणमानमधील नागरिकांनी त्याचे जंगी स्वागत केले.सातोरी ॲडव्हेंचर एव्हरेस्ट अभियान यांच्यातर्फे मार्च २०२१ मध्ये ही तीन सदस्य असलेली एव्हरेस्ट शिखर मोहीम राबवण्यात आली. यात अभियान निदेश प्रबंधक ऋषी भंडारी यांच्या सांगण्यानुसार, या तीन सदस्यांमध्ये हर्षवर्धन जोशी, नेपाळी फुर्ते शेरपा आणि अनुप राय यांचा समावेश होता.हर्षवर्धन हा आधीपासूनच गिर्यारोहक म्हणून वसईकरांना परिचित होता, तर आपण माऊंट एव्हरेस्ट सर करायचे हे त्याचे जुने स्वप्न होते. यासाठी आर्थिक पाठबळही भरपूर प्रमाणात लागणार होते. तरीही त्याने जिद्दीने यासाठी स्वतःची बचत केलेली काही रक्कम, मित्र, काही कंपनी, नातेवाईक तसेच वसई-विरार शहर महानगरपालिका यांनाही मदतीसाठी आवाहन केले. त्यावेळी वसई-विरार महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने त्यास चार लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. या मोहिमेत त्याला ६० लाखांहून अधिक खर्च आल्याचे हर्षवर्धन याने सांगितले.३० मार्च रोजी हर्षवर्धनने वसईवरून नेपाळ देशासाठी प्रवास सुरू केला. प्रत्यक्षात ६ एप्रिल रोजी त्याने माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यास सुरुवात केली, मात्र हे सर्वोच्च शिखर सर करताना त्याला कोरोनाने गाठले आणि आठ दिवस बेस कॅम्पमध्ये तंबूत स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवून त्यावर त्याने यशस्वी मातही केली आणि पुन्हा एव्हरेस्टवर चढाई सुरू केली. अखेर तो दिवस उजाडला आणि २३ मे रोजी सकाळी हर्षवर्धनने ही आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट अभियान मोहीम पूर्ण केली.