मोखाडा : मोखाडा तालुक्यातील उधळे गावात विक्रमगड विधानसभा युवक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन तसेच पक्षवाढीस कार्यकर्त्यांना उद्भवणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी अखिल भारतीय युवक काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी हृत्विकजी जोशी यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या समस्या समजून घेत पक्षवाढीसाठी आपण सर्वांनी तळागाळातील जनतेपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत, असे सांगितले. काँग्रेस सरकारने आदिवासींसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या आहेत, तर मोदींनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनेदेखील पाळलेली नाहीत. देशातील सरकार हे शेतकऱ्यांच्या विकासासाठी नसून कृषी क्षेत्रापेक्षा उद्योगधंद्यांच्या विकासाकडे अधिक लक्ष देत असल्याचा आरोपदेखील त्यांनी या वेळी केला. शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचे विविध राज्यांत मोर्चे, आंदोलने चालू असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे सचिव निलेश विश्वकर्मा यांनी आदिवासी भागातील युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. पुष्कराज वर्तक यांनी कार्यकर्त्यांना पक्षवाढीचे काम करताना येणाऱ्या अडचणी वरिष्ठांच्या नजरेत आणून देत मिलिंद झोले व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदनदेखील केले. या कार्यक्रमास पालघर लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष पुष्कराज वर्तक, उपाध्यक्ष सचिन शिंगडा, सरचिटणीस संदीप मेने, संदीप पाटील, विक्रमगड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मिलिंद झोले, सरचिटणीस केशव गांवढा, वामन दिघा, हिरामण ठोमरे, नरेश झोले आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
युवक काँग्रेसचे मार्गदर्शन शिबिर
By admin | Published: October 06, 2015 12:05 AM