तलासरी : पंचायत राज व्यवस्थेत नेतृत्व विकासाची मोठी संधी आहे. या योजनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने परिवर्तन घडवून आणण्यासाठी युवक-युवतींनी या व्यवस्थेचा भाग बनून सक्रिय झाले पाहिजे, असे आवाहन कॉ. गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तलासरी व डॉ. पी.व्ही. मंडलिक ट्रस्ट आयोजित ‘पंचायत राज व्यवस्थेतील नेतृत्व गुण विकास संधी’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत अनेक वक्त्यांनी व्यक्त केले.
या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार विनोद निकोले यांनी केले. याप्रसंगी त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांचा आमदार कसा झालो. याबद्दलचे अनुभव कथन केले. पंचायत राज योजनेमुळे लोकशाही व्यवस्था कशी बळकट करता येईल, याविषयी मार्गदर्शन केले. अॅड. मुक्ता दाभोळकर यांनी ग्रामसभेतून गावाचा विकास करण्यासाठी युवकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, हे अनेक दाखले देऊन पटवून दिले. तसेच स्थानिक संस्थांमध्ये युवक-युवतींनी स्वत:च्या विकासाबरोबरच गावाचा विकास करण्यासाठी सहभागी होऊन, एकूणच राष्ट्र विकास करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
साधना वैराळे यांनी डॉ. पी.व्ही. मंडलिक ट्रस्टच्या माध्यमातून पंचायत राज अभियान राबविण्यासाठी उभारलेल्या चळवळीचे विविध अनुभव कथन केले. प्रमोद गोवारी या कार्यकर्त्याने आपले अनुभव कथन करून सरपंचाच्या माध्यमातून पंचायत राज योजनेमुळे गावाचा कसा विकास करता येतो हे सांगितले.संस्थेचे अध्यक्ष एल.एस. कोम यांनी या वेळी आपले राजकीय अनुभव सांगून तरुणांनी सर्व योजनांची माहिती करून घेतली पाहिजे व समाजाच्या सर्व थरांतील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी कार्यक्र माबद्दल अभिप्राय नोंदविला आणि आम्ही नक्कीच समाजाच्या उन्नतीसाठी सर्व योजनांची माहिती करून देण्यासाठी सक्रि य राहू, अशी मते व्यक्त केली. या कार्यक्र मास सर्व प्राध्यापक, दोनशेहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
सुरेखा दळवी यांनी आदिवासी समाजासाठी असलेला कायदा किती महत्त्वाचा आहे, हे सांगून या कायद्याची अंमलबजावणी नीट करण्यासाठी कायदा समजून घेण्यासाठी तरुणांनी अभ्यास केला पाहिजे. हा आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी अतिशय महत्त्वाचा कायदा असल्याचे सांगितले. अल्लाउद्दीन शेख यांनी ग्रामसभेच्या माध्यमातून विविध समित्यांचे महत्त्व सांगून रेशन व्यवस्था किती महत्त्वाची आहे. या व्यवस्थेत भ्रष्टाचार कसा होतो. तो कमी करण्यासाठी युवकांनी काय केले पाहिजे, याविषयी उत्तम मार्गदर्शन केले. तसेच पंचायत राज अभियानासंदर्भात गीतही सादर केले.