पालघर : वडराई मध्ये रस्त्याच्या कडेला फेकून दिलेल्या बालिकेचा टाहो एकूण तिच्या भोवती जमलेल्या घोळक्यातून एकही हात मदतीला पुढे येत नसल्याचे पाहिल्या नंतर जयेश संजय मेहेर आणि कुंदन प्रमोद चुरी ह्या तरु णांनी मातीत माखलेले ते बाळ आपल्या शर्टात गुंडाळून थेट प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. मातृत्वाला काळिमा फासणारी ही घटना रविवारी तालुक्यातील वडराई गावातील भेंडी पाड्यात घडली. रात्रौ १०.३० वाजण्याच्या सुमारास जयेश व त्याचा मित्र कुंदन हे दोघेजण जात असताना गडबड चालू असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता गटाराचे घाण पाणी आणि कचरा टाकण्याच्या अत्यंत घाणेरड्या जागी एक नुकतेच जन्मलेले मुल दिसले. ते अनैतिक संबंधातून अथवा एकाच घरात जास्त मुली जन्माला आल्याने फेकून दिले असावे अशा प्रकारची चर्चा घोळक्यातून ऐकू येत होती. मात्र त्या उपस्थितांच्या चर्चेत मुलीचा रडण्याचा आर्त स्वर घोळक्यात जमलेल्या एकाही महिलेच्या कानावर पडत नव्हता. कशाला फुकटची ब्याद, कशाला पोलिसांच्या चौकशीचा फुकटचा ससेमिरा आदी अनेक वाक्य त्या घोळक्यातून ऐकायला येत असताना त्या लहान बाळाला योग्य उपचाराची गरज असल्याचे या दोघांच्या लक्षात आले. आणि त्या घोळक्याला बाजूला सारीत त्या दोन्ही सहृदय मित्रांनी माती आणि घाणीत माखलेले ते बाळ उचलले. त्या बाळाच्या अंगावरची घाण साफ करीत एका मित्राने त्याच्या अंगातील शर्टमध्ये गुंडाळून माहीम चे प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. डॉ. कल्पना मावची ह्यांनी बाळाला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्याच्या सूचना दिल्या.उपस्थित सर्व एकमेका कडे पाहू लागले. ह्यावेळी डॉक्टरांनी बोलावून घेतलेल्या केळवे सागरी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षका सिध्दवा जायभाये ह्यांनी त्या बाळाची जबाबदारी स्वीकारीत पालघरच्या ढवळे रु ग्णालयात दाखल केले. त्याची योग्य तपासणी प्रथम करा,त्याचा खर्च करायला मी तयार असल्याचे जायभाये ह्यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या जिल्हा महिलाध्यक्षा निलम राऊत ह्यांनीही त्या बाळावर योग्य उपचार करण्याचा आग्रह धरला.
तरुणाईचा, वर्दीचा असाही माणुसकीचा गहिवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 2:40 AM