हितेन नाईकपालघर : पालघर जिल्हा परिषदेत शिवसेना (१८) आणि राष्ट्रवादी (१४) मिळून बहुमताचा आकडा होत असल्याने राज्याच्या महाआघाडीप्रमाणे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशी महाविकास आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. त्याच वेळी शिवसेना या आघाडीतून जिल्ह्यातील एक नंबरचा शत्रू असलेल्या बहुजन विकास आघाडीला मात्र आघाडीबाहेर ठेवले जाणार आहे.पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ सदस्यांपैकी शिवसेना १८, राष्ट्रवादी १४, भाजप १२, माकप ५, बविआ ४, अपक्ष ३ तर काँग्रेस १ असे संख्याबळ आहे. शिवसेना १८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. सत्तास्थापनेसाठी बहुमताचा २९ हा आकडा पार करण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी (१४ जागांसह) काँग्रेस (१) आणि जिजाऊ संघटना (अपक्ष) (१) अशी साथ मिळवावी लागणार आहे.राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी महाआघाडीची सत्ता नांदत असल्याने पालघर जिल्हा परिषदेतही हीच महाआघाडी सत्ता स्थापन करेल, असेच चित्र सध्या तरी दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या अडीच वर्षाचे आरक्षण महिला (अनुसूचित जमातीसाठी) साठी राखीव असून सत्ता स्थापनेत सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना पहिल्या अडीच वर्षाच्या अध्यक्षपदाचा दावा करणार असल्याचे कळते. राष्ट्रवादी पक्षानेही ते मान्य केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. पुढच्या अडीच वर्षाचे आरक्षण बदलल्यास अध्यक्षपदाचा मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार आहे. शिवसेनेकडून शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा यांचीपत्नी अमिता घोडा, वैदेही वाढाण आणि भारती कामडी यांचीही नावे चर्चेत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या १४ पैकी विक्रमगडमधील ३, जव्हारमधील १, वाडामधील ४ जागा आपल्या ताकदीवर निवडून आणण्यात यशस्वी झालेले आणि स्वत:ही अपक्ष म्हणून निवडून आलेल्या जिजाऊ संस्थेच्या नीलेश सांबरे यांची उपाध्यक्षपदासाठी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तर सेनेकडून सतत पाच वर्षांपासून निवडून येणाऱ्या प्रकाश निकम यांची वर्णी लागू शकते. चार सभापतीपदांचे दोन्ही पक्षात समसमान वाटप केले जाऊ शकते.राज्यात भाजप सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात असताना बविआने भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र नंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन झाल्यावर महाविकास आघाडीला पाठिंबा देणाºया बविआची राज्यात साथ असली तरी जिल्ह्यात सेना आणि बविआमधून विस्तवही जात नाही. त्यामुळे इथे जिल्ह्यात सेनेच्या पदाधिकारी, शिवसैनिकांमधून कुठल्याही परिस्थितीत बविआला सत्तेत घेऊ नये अशी मागणी केली जात आहे. त्याच वेळी सेना आणि राष्ट्रवादी या दोघांची बेरीज बहुमताचा आकडा पार करीत असल्याने बविआला बरोबर घेण्याची गरजही निर्माण होणार नाही. तर राज्यातील महाआघाडीच्या सत्तेत माकपने पाठिंबा न दर्शवता तटस्थ राहिल्याने इथेही त्यांची तटस्थची भूमिका असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.>‘मातोश्री’च्या आश्वासनामुळे अमिता घोडा यांना लागणार अध्यक्षपदाची लॉटरी?अलीकडेच झालेल्या पालघर विधानसभा निवडणुकीत सेनेतून बंडखोरी करून राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरून सेनेचे अधिकृत उमेदवार श्रीनिवास वणगा यांच्याविरोधात शड्डू ठोकणाºया अमित घोडा यांची उमेदवारी वणगा यांना धोकादायक ठरू लागली होती. त्यामुळे अमित घोडा यांची बंडखोरी मोडून काढण्यासाठी त्यांना मातोश्रीची वारी घडविण्यात आली होती. अमित घोडा यांना माघार घेण्याच्या मोबदल्यात त्यांच्या पत्नी अमिता घोडा यांना उमेदवारी आणि सत्ता आल्यास अध्यक्षपद असे आश्वासन देण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे मातोश्रीचा शब्द अंतिम समजला जात असल्याने अमिता घोडा यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडू शकते. दुसरीकडे अमित घोडा शिवसेनेच्या इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना जुमानत नसल्याने अमिता घोडा यांना अध्यक्षपद न देता ते अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहणाºया वैदेही वाढाण अथवा भारती कामडी यांना देण्यात यावे, असे इथल्या पदाधिकाºयांनी सेनेच्या श्रेष्ठींना कळवल्याचे समजते.
जिल्हा परिषदेत होणार महाविकास आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 1:00 AM