- राहुल वाडेकरविक्रमगड : जि.प.च्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांची १५० पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहात आहे. त्यामुळे एक अथवा दोन शिक्षकांना अनेक वर्गाना शिकवावे लागत आहे. शिवाय शासनाच्या योजना आणि इतर कामे करावी लागत असल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जावर परिणाम झाला आहे.तालुक्यात जिल्हा परीषद शाळे अंतर्गत व इतर आश्रम शाळेत एकूण १६ हजार ६७२ विद्यार्थीशिक्षण घेत आहेत. असे असताना विक्रमगड पंचायत समिती याच्या शिक्षण विभागात एकूण ७९७ पदे मंजुर असुन त्या पैकी ६२९ पदे भरण्यात आली आहेत तर १६८ पदे रिक्त आहेत. या मध्ये विस्तार अधिकारी वर्ग - २ मधील ४ पदे मंजुर असुन ३ पदे रीक्त आहेत. विस्तार अधिकारी वर्ग - ३ मधील ३ पदे मंजुर असून २ पदे रिक्त आहेत. केंद्रप्रमुखाची १६ पदे मंजुर असुन २ पदे रिक्त आहेत. मुख्यध्यापकाची ३६ पदे मंजुर असून ११ पदे रिक्त आहेत. पदविधर शिक्षकाची १५० पदे मंजुर असून ७९ पदे रिक्त आहेत. तर सहशिक्षकाची ५८६ पदे मंजुर असून ७१ पदे रीक्त आहेत. अशी तालुक्यातील शिक्षण विभागा अंतर्गत ७९७ पदा पैकी १६८ पदे रीक्त आहेत.ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत चौथी ते सातवीच्या अनेक विद्यार्थ्यांना गुणाकार, भागाकार व इंग्रजीत स्पेलिंगचे पाहिजे तसे ज्ञान मिळत नसल्याने त्याचा शैक्षणिक पाया कमकुवत असल्याचा आरोप पालकांन कडून होत आहे. आदिवासी तालुका असल्याने शासनाचे या भागाकडे दुर्लक्ष होत आहे. फक्त शाळा दुरुस्तीवर ठेकेदाराच्या फायदयासाठी लाखो रुपये खर्च केला जात असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. पदवीधर शिक्षकाची ७९ तर सहशिक्षकाची ७१ अशी १५० पदे रिक्त आहेत. या परिस्थितीमुळे एक किंवा दोन शिक्षकांना दोन ते तीन वर्ग सांभाळण्याची वेळ आली आहे. रिक्त पदांमुळे तालुक्यातील शैक्षणिक दर्जा ढासळत चालला आहे. अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेतून नाव काढून पालक खासगी शाळांना पसंती देत आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात खासगी शाळांचा वरचष्मा आहे. त्याची फी परवडणारी नसतांनाही पालक आर्थिक अडचण सोसून ती विनातक्रार भरत आहेत.पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्या संदर्भात वरीष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यावहार केला आहे.- भगवान मोकाशी, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती, विक्रमगडविक्र मगड तालुक्यात शिक्षणाची स्थिती भयावह आहे. रिक्त पदामुळे एका शिक्षकाला दोन ते तीन वर्ग सांभाळावे लागत आहेत. त्यातच तालुक्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही घसरली असून जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्या संदर्भात शासनाने उपाय योजना करायला हव्यात.- ज्ञानेश्वर (शिवा) सांबरे,तालुका अध्यक्ष, विक्रमगड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
विक्रमगड तालुक्यात जि.प. शिक्षण विभागाचा ‘पांगुळगाडा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:49 PM