ठाणे - पालघर जिल्ह्यातील बहुतांश निकाल हाती आले असून यामध्ये सर्वाधिक जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. ५७ पैकी १८ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेत तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागा मिळविण्यात यश आलं आहे. पालघर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ६३ टक्के मतदान झालं होतं.
पालघरमधील ५७ जागांपैकी भाजपा १०, शिवसेना १८, काँग्रेस - १, राष्ट्रवादी १५ तर बविआ -४, इतर ९ याप्रमाणे जागा निवडून आल्या आहेत. पालघर जिल्हा परिषदेत यापूर्वी भाजपाचे २१ सदस्य निवडून आले होते त्यातील ११ जागा भाजपाच्या कमी झालेल्या दिसत आहेत. तर शिवसेना मागील वेळी १५ जागांवर निवडून आली होती. तर एक बंडखोर शिवसेना उमेदवार निवडून आला होता.
यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचं संख्याबळ २ जागांनी वाढलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यावेळी ४ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र यंदा राष्ट्रवादीने १५ जागांवर घवघवीत यश मिळविलं आहे. काँग्रेसने आपली एक जागा राखण्यात यशस्वी झालेत.
पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या होत्या तर काँग्रेस-राष्ट्रवादी, बविआ आणि माकप यांनी महाआघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे बहुमताचा २९ आकडा गाठण्यासाठी शिवसेनेला भाजपा अथवा काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागणार आहे.