पालघर : जिल्हा परिषदेच्या एका माजी सदस्यांच्या सधन असलेल्या मुलाला कोंढाण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जितेंद्र संखे यांनी बेकायदेशीररीत्या घरकूल योजनेचा लाभ दिल्याने गरिबांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी असलेल्या योजनेचा दुरुपयोग केला गेला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी घेऊन ग्रामसेवक संखे आणि केंद्र प्रमुख ईश्वर दळवी यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांच्याकडील शासन निर्णयाप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत कोंढाण ग्रामपंचायत हद्दीतील २०१५ च्या प्राधान्य यादीतील पात्र लाभार्थ्यांची वर्गवारी ग्रामसभेत करण्यात आली होती. ग्रामसभेत घेतलेल्या ठरवानुरूप इतर संवर्गातून २५ तर अनुसूचित जमाती संवर्गातील यादीमधून ५० लाभार्थी पात्र ठरविण्यात आले होते. त्यानुसार इतर संवर्गातील यादीतून अमोल अच्युत पाटील यांना पात्र म्हणून निवड करण्यात आली होती. ग्रामविकास अधिकारी संखे व क्षेत्रीय अधिकारी यांनी प्राधान्यक्रम यादीतील पात्र लाभार्थ्यांची प्रत्यक्षात घर व जमिनीची खात्री करून जागा स्वतःची असल्याबाबत अहवाल पंचायत समितीकडे देण्यात आला होता. त्यामुळे सदरचा अहवाल ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठविल्यानंतर तो मंजूर करण्यात आला होता. पंचायत समिती सदस्य महेंद्र अधिकारी यांनी ही बाब माहितीच्या अधिकाराखाली समोर आणली आहे.प्राधान्यक्रम यादीनुसार लाभार्थी पाटील यांचे घरकुलाचे काम सुरू करण्यापूर्वी त्यांचे घर व नवीन बांधकामाच्या ठिकाणाच्या जिओ टॅगिंग करण्यात आले होते. ग्रामपंचायतमधील आकारणी नोंदवही नमुना ८ मध्ये सदर लाभार्थ्यांच्या नावे २००५-०६ पर्यंत झोपडी असल्याची नोंद असून त्यानंतर २०१९-२० पर्यंत झोपडी किंवा विटा माती इमारत अशी नोंद आहे. त्यामुळे एका सधन असलेल्या व्यक्तीला घरकुल योजनेचा लाभ दिल्याची गंभीर बाब समोर आली होती. याविरोधात पंचायत समिती सभेत विचारणा झाल्यावर पंचायत समितीने विस्तार अधिकारी विनोद पाटील आणि अविनाश उराडे यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यांनी सादर केलेल्या अहवालात सदर घरकुल चुकीचे वाटप करण्यात आल्याचा ठपका ठेवून ते रद्द करीत ग्रामविकास अधिकारी संखे आणि केंद्र प्रमुख दळवी यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले आहे. अहवालात ठपका पंचायत समिती सभेत विचारणा झाल्यावर विस्तार अधिकारी विनोद पाटील आणि अविनाश उराडे यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यांनी सादर केलेल्या अहवालात सदर घरकुल चुकीचे वाटप करण्यात आल्याचा ठपका ठेवला आहे.
जि.प. माजी सदस्याच्या सधन मुलाला गरिबांसाठीच्या घरकूल योजनेचा लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 1:35 AM