बोर्डी : तालुक्यातील जिल्हा परिषद गोवणे शाळेचा विद्यार्थी निमेश रामधन पाल याची एशियन चिल्ड्रन इनक्की फेस्टा या आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेच्या ग्रँड प्रिक्स अॅवार्डकरिता आंतरराष्ट्रीय समिती जपानकडून निवड करण्यात आली आहे. त्याने स्पर्धेकरिता वारली चित्रशैलीतील चित्र काढले होते. पालघर जिल्ह्याच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या औचित्यावर हा योग जुळून आल्याने आनंद द्विगुणित झाला आहे.
यूनेस्कोमार्फत आशिया खंडातील २४ देशांतील विद्यार्थ्यांसाठी एशियन चिल्ड्रन इनक्की फेस्टा या आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. आशिया खंडातील २५हजारांपेक्षा अधिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. तालुक्यातील नवोपक्रमशील आणि राज्य पुरस्कार विजेते शिक्षक विजय बाळासाहेब पावबाके हे यूनेस्को राष्ट्रीय कमिटीचे सदस्य तसेच राज्य समन्वयक आहेत. यूनेस्को स्कूल क्लबच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील अनेक शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेचे विजेते दोन स्तरावर निवडले जातात. प्रथम राष्ट्रीय स्तराकरिता राष्ट्रीय निवड समिती प्रत्येक राज्यातून विद्यार्थ्यांची निवड करते. या वर्षी विजय पावबाके यांनी राज्यभर सुरू केलेल्या यूनेस्को स्कूल क्लबमुळे राज्यातील २५ तर पालघर जिल्ह्यातील ३ विद्यार्थ्यांना या स्पर्धेतील राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यानंतर प्रत्येक देशातील सर्वोत्तम आठ चित्रे आंतरराष्ट्रीय निवड समिती जपानकडे पाठवली जातात. ही समिती त्यापैकी २४ चित्रांची आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स अॅवार्डसाठी निवड करते. विजय पावबाके व वर्गशिक्षक दीपक साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद गोवने शाळेतील विद्यार्थ्याने काढलेल्या वारली चित्रांची निवड या पुरस्कारासाठी झाली आहे.
‘‘निमेश हा शाळेतील अष्टपैलू विद्यार्थी आहे. मागील वर्षी त्याचा बास्केटबॉल स्पोर्ट प्रकारातील गिनीज रेकॉर्ड थोडक्यात हुकला होता. या वर्षी मात्र चित्रकलेतील आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून त्याने नावलौकिक मिळविला आहे.’’- विजय पावबाके, राज्य समन्वयक, युनेस्को