- राहुल वाडेकरविक्रमगड : विक्रमगड तालुक्यात रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. त्याचा परिणाम हा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या पटसंख्येवर दिसून येतो. यावर खोमारपाडा जि.प. शाळेचे शिक्षक बाबू चांगदेव मोरे यांनी पालकांचे स्थलांतर रोखण्यासाठी गावपाड्यांवर जाऊन शेतीविषयक मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. मोरे यांचे हे शेतीचे प्रयोग यशस्वी ठरून गावातच रोजगार मिळाल्याने स्थलांतर थांबण्यात मदत झाली आहे. त्यामुळे शाळेतील पटसंख्येतही वाढ झाली.खोमारपाडा येथील जि.प.च्या प्राथमिक शाळेवर २०१३ मध्ये बाबू मोरे या शिक्षकाची बदली झाली. ही शाळा तेव्हा पहिली ते पाचवीपर्यंत होती, तेव्हा पटसंख्या ८८ होती. ते जेव्हा शाळेत हजर झाले, तेव्हा लोकांची भातशेतीची कामे पूर्ण होत आली होती. पालक कामाच्या शोधात बाहेर गावी जाण्याचा तो काळ होता. पालकांसोबत मुलेही जात असत. शासनाने स्थलांतरित होऊन गेलेल्या किंवा आलेल्या मुलांची शिक्षणाची सोय केली आहे. मात्र, मुलांना नवीन वातावरणात जुळवून घेताना त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता. दरवर्षी १६ ते १७ मुलांचे पालकांबरोबर स्थलांतर होत होते. त्यानंतर, मोरे यांनी पाड्यातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊ न आठ ते १० मुले शाळेत दाखल करून घेतली. तसेच या मुलांचे स्थलांतर थांबवण्यासाठी शेतीमध्ये मार्ग शोधला. या शाळेच्या आवारात जागा कमी असताना आले, बटाटे, मिरची, रताळे, इत्यादी पिकांची प्लास्टिक टबमध्ये लागवड करून मोरे यांनी मुलांमध्ये शेतीविषयक आवड निर्माण केली. शाळेच्या समोर अर्धा गुंठा पडीक जागेत मेथी, पालक, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर इत्यादी शालेय पोषण आहारात उपयोगी पडतील, अशा पिकांची मुलांच्या मदतीने लागवड केली. मुलांना शेतीविषयक प्रात्यक्षिकातून माहिती देणे आणि पालकांना प्रेरित करणे, हा त्यामागे उद्देश होता.या शेतीतून मुलांना साडेतीन महिने भाज्या मिळाल्या, सहा महिन्यांचे कांदेही मिळाले. त्यानंतर, २०१६ मध्ये गणपतीच्या सुटीच्या आधी पालकांची बैठक बोलावून त्यामध्ये ३५ ते ४० पालकांना प्रोजेक्टरवर काही शेतीविषयक व्हिडीओ दाखवले. यातून प्रेरणा घेऊ न पालकांनी त्या वर्षी गवार, कांदा, वांगी, दुधी, हरभरे, कलिंगड, काकडी, भेंडी आदी पिकांची लागवड केली. शाळा सुटल्यावर किंवा सुटीच्या दिवशी मोरे यांनी स्वत: शेतावर जाऊन पालकांना मार्गदर्शन केले. यातून बाहेर जाऊ न मिळणाºया पैशांपेक्षा जास्त पैसा मिळू लागला आणि त्या वर्षापासून या शाळेचे स्थलांतर प्रमाण शून्यावर आले. .या वर्षी उपक्र म नवीन ५० कुटुंबांत राबवण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांमध्ये शेतीची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या पालकांचे होणारे स्थलांतर थांबून त्यांना शाश्वत रोजगार मिळावा, त्यांच्या शिक्षणासाठी, पालकांसाठी, पाड्यासाठी माझे प्रयत्न आहेत.- बाबू चांगदेव मोरे, शिक्षक,जि.प. प्राथमिक शाळा खोमारपाडा, विक्र मगडबाबू मोरे या शिक्षकांनी आम्हाला शेती व भाजीपाला लागवडीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आमच्या भागात शेतकरी रोजगारासाठी स्थलांतर न करता पाड्यातच रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.- संजू पापडे, पालक, फणसीपाडा
जि.प. शाळेतील पटसंख्या राखण्यासाठी गुरुजींचे शेतीप्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 7:17 AM