कारंजा लाड : कारंजा तालुक्यातील शेरपूर येथे अनधिकृत ले-आऊट केलेली १० एकर जमिन शासन जमा करण्याचा आदेश तहसिलदार धीरज मांजरे यांनी २४ फेब्रुवारी रोजी पारीत केला.शेरपुर येथील सर्वे नंबर ८/१ क्षेत्र २, ०२ हे.आर. व सर्वे नंबर ८/१अ क्षेञ २.०२ हे.आर शेतजमीन ही अर्जदार नासीर खान शेर खान यांचे आजोबा कलंदर खान भिकन खान यांच्या मालकिची होती. ही शेतजमीन रज्जू गंगा कालीवाले यांना वहितीकरिता कुळ मालकी हक्काअन्वये दिली होती. या शेतीचा वापर अकृषक म्हणून करण्यावर कायद्याने निर्बंध आहेत. असे असताना गैरअर्जदार रमेश नारायण चांडक, सुरेश रामनारायण चांडक व शंतनू श्यामसुंदर चाडक यांनी कूळ शेतजमिनीचा विनापरवानगी अकृषक वापरात बदल केला. याप्रकरणात कारंजा तहसिलदार यांनी उपरोक्त तिघांवर यापूर्वीच दंडात्मक कारवाई केली. असे असतानाही या कुळ शेतजमिनीचा विनापरवानगी अकृषक वापर सुरूच असून, गैरअर्जदार अफजल खान बिस्मिल्ला खान, आमीर खान अफजल खान, अन्वर खान अफजल खान, अश्रफ खान अफजल खान, सीमा अजित सातपुते, यासिर गप्पार अन्सारी, वहीद युनुस मिर्झा, सविता रत्नाकर उदयकार, अब्दुल कामिल अब्दुल रजाक, प्रवीण रमेशचंद्र ठाकूर यांनी कुळ शेतजमिनीचे सपाटीकरण करून चुना टाकून भूखंडाची आखणी केली तसेच खासगी ले-आऊट नकाशा तयार केला असून लेआउट मधील प्लॉट्सची विक्री ग्राहकांना केल्याच्या माहितीवरून नासीर खान शेर खान (३५) रा. मज्जीद पुरा कारंजा यांनी कारंजा तहसीलदार धिरज मांजरे यांच्याकडे तक्रार दिली. या प्रकरणी सविस्तर युक्तीवाद होऊन कुळ कायदा नियमाचे उल्लंघन व शर्तभंग झाल्यामुळे १० एकर कूळ शेतजमीन सरकार जमा करण्याचा आदेश तहसिलदार मांजरे यांनी पारीत केला.
अनाधिकृत ले-आउट केलेली १० एकर जमीन शासन जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 7:14 PM