जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी नव्याने १० रुग्ण आढळून आले तर, ८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मानोरा, मंगरुळपीर व मालेगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१,५९५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०,८८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर, आतापर्यंत ६२२ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००
तीन तालुके निरंक
गुरुवारच्या अहवालानुसार मानोरा, मालेगाव व मंगरुळपीर या तीन तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम तालुक्यातील सोंडा येथे एक, रिसोड शहरात तीन व ग्रामीण भागात चार, कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे एक रुग्ण आढळून आला.