लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जमाफी प्रक्रियेस वेळ लागणार असल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बी-बियाणे खरेदी करण्याकरिता १० हजार रुपयांचे कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाने १४ जून रोजी आदेश काढला; परंतु यासंदर्भातील कुठलेच निर्देश अद्याप प्राप्त नसल्याचे बँकांकडून शेतकरी दाखल करीत असलेल्या शपथपत्रांवर लेखी स्वरूपात लिहून दिले जात आहे. परिणामी, कर्ज घेण्याकरिता बँकांमध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांना आल्या पावली खाली हात परतावे लागत आहे. कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १ जूनपासून संप पुकारला. सात दिवस चाललेल्या या संपाची दखल घेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारी समिती स्थापन करून ११ जून रोजी या समितीची बैठक पार पडली. त्यात ठरल्यानुसार थकीत कर्जदार शेतकऱ्यांसोबतच अन्य शेतकऱ्यांकडे असलेले पीक कर्ज माफ करण्याबाबत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. मात्र, कर्जमाफीसाठी पात्रता व इतर अटी निश्चित करण्यासाठी वेळ लागणार असल्याने कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना खरीप हंगामात पेरणीसाठी आवश्यक बी-बियाणे, खते खरेदीकरिता १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचा आदेश देण्यात आला. यासाठी ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना तातडीचे कर्ज देण्यासंदर्भात जिल्हा बँका व व्यापारी बँकांना आदेश जारी करण्यात आला आहे; परंतु यासंदर्भात वाशिम जिल्ह्यातील एकाही बँकेला १६ जूनपर्यंत कुठलेच निर्देश प्राप्त झालेले नाहीत. परिणामी, शपथपत्र घेऊन बँकेत जाणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या पावली खाली हात परतावे लागत आहे. यामुळे शासनाचा तकलादूपणा उघड होत असून, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील शेतकऱ्यांमध्ये या धोरणाप्रती संताप व्यक्त होत आहे. चलन तुटवड्याचा प्रश्न अद्याप कायम; बँकांकडून कर्जपुरवठा होणार तरी कसा?स्वत:ची गरज भागवून जिल्ह्यातील इतर बँकांना चलन पुरविणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियाला रिझर्व्ह बँकेकडून पुरेशा प्रमाणात चलन मिळणे दुरापास्त झाले आहे. त्याचा थेट परिणाम खरीप पीक कर्ज वितरणावरही झाला आहे. ११५० कोटी रुपये उद्दिष्टाच्या तुलनेत गुरुवारपर्यंत केवळ २२ टक्के कर्ज वाटप झाले असून, ज्या शेतकऱ्यांना कर्ज मंजूर झाले, त्यांची रक्कम बँकेत अडकून आहे. अशा स्थितीत नव्याने कर्जमाफीस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीच्या कर्जवाटप योजनेंतर्गत प्रत्येकी १० हजार रुपये कर्ज पुरवठा करणार तरी कसा, असा प्रश्न बँकांना भेडसावत आहे. त्यामुळे शासनाने जरी तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले असले, तरी ते मिळेलच, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तातडीचे कर्ज देण्यास बँक व्यवस्थापकांचा ‘लेखी’ नकार!पंचाळा (ता. वाशिम) येथील नारायण श्रीरंग विभूते आणि चतुराबाई श्रीरंग विभूते या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी नियमानुसार शपथपत्र भरून १६ जून रोजी बँक आॅफ इंडियाकडे तातडीच्या १० हजार रुपये कर्जाची मागणी केली. मात्र, यावेळी बँकेच्या व्यवस्थापकांनी वरिष्ठ पातळीवरून यासंदर्भात कुठलेच स्पष्ट निर्देश नसल्याने कर्ज देण्यास नकार दर्शविला. जिल्ह्यातील वाशिमसह इतर तालुक्यांमधील असंख्य शेतकऱ्यांनाही असाच अनुभव येत आहे. स्टेट बँकेलाही तातडीचे १० हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात अद्याप निर्देश नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तातडीच्या १० हजार रुपये कर्जास बँकांची ‘नकारघंटा’!
By admin | Published: June 17, 2017 12:59 AM