लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी, कोराडी आणि येळेगाव या धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडले जात असून यामुळे नदीला शनिवारी व रविवारी मोठा पूर आला. त्याने वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील १० गावांचा संपर्क तुटला. तसेच शेकडो शेतकऱ्यांच्या सोयाबीन सुड्याही पुराच्या पाण्यात वाहून गेल्या.आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून वाशिम जिल्ह्यात अधूनमधून जोरदार पाऊस कोसळत आहे. अवकाळी स्वरूपातील या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबिन, तूर, कपाशी या पिकांची प्रचंड प्रमाणात हानी झाली आहे. याशिवाय फळबागांनाही जबर फटका बसला आहे. यामुळे जिल्हाभरातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे पुरते संकटात सापडले आहेत.दरम्यान, जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण आणि बाधीत पिकांचे पंचनामे करण्याचे काम महसूल, कृषी विभागासह प्रशासनातील अन्य यंत्रणांकडून केले जात आहे. अशातच वाशिम जिल्ह्याला लागून असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातही धुवाँधार पाऊस होऊन पेनटाकळी, कोराडी आणि येळेगाव ही धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने त्याचे पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आल्याने शनिवारी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहिली. यामुळे नदी काठावर वसलेल्या रिसोड तालुक्यातील वाकद, गोहोगाव, महागाव, बाळखेड, सरपखेड, पेनबोरी, धोडप बु., धोडप खु., देगाव, रिठद यासह अन्य काही गावांमधील शेतशिवारांमध्ये पुराचे पाणी शिरले. शेतांमध्ये शेतकऱ्यांनी रचून ठेवलेल्या सोयाबिनच्या सुड्या वाहून गेल्या. यासह शेकडो हेक्टर शेतजमिनीवरील सुपीक माती वाहून गेली. पुरामुळे शनिवारी दिवसभर आणि रविवारी सायंकाळपर्यंत दहा गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क पुर्णत: तुटला होता. रात्रीच्या सुमारास पुराचे पाणी ओसरल्यानंतर विस्कळित झालेले जनजीवन पुर्वपदावर आले; मात्र तोवर शेतशिवारांमध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने आधीच संकटात सापडलेला शेतकरी अधिकच हतबल झाला आहे.बुलडाणा जिल्ह्यातील धरणांमधून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुरात शेतांमध्ये उभी असलेली तूर आणि हळद या पिकांना जबर फटका बसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात २७ आॅक्टोबरपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे प्रशासनाकडून केले जात असतानाच आता पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामेही करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी बाधीत शेतकºयांमधून जोर धरत आहे.अवकाळी पावसामुळे बाधीत झाली ८०२ गावे; २११ गावांमध्ये पंचनाम्याचे काम पूर्ण!जिल्ह्यात गत काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ८०२ गावे बाधीत होऊन सोयाबिन, तूर, कपाशी या पिकांसोबतच फळबागा व काहीठिकाणी फुलपिक व भाजीपाला पिकांची जबर हानी झाली. दरम्यान, प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीची पाऊले उचलत ३ नोव्हेंबरपर्यंत २११ गावांमधील ५७ हजार ७३८ शेतकºयांच्या शेतातील नुकसानाच्या पंचनाम्याचे काम पूर्ण केले आहे. त्याच्या याद्या ४० ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध देखील करण्यात आल्या आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.
पैनगंगेच्या पुरामुळे तुटला १० गावांचा संपर्क!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 2:46 PM