ऑनलाइन लोकमत
कारंजा लाड, दि. 20 - १०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणल्याच्या प्रकरणाची शाई वाळली नसतानाच, पुन्हा १०० रुपयाच्या दोन बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न झाला.
१०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील दोन आरोपींना अटक केली होती. पोलिस कोठडी दरम्यान त्यांनी दिलेल्या कबुली जबाबानुसार, या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार फरार असून कारंजा शहर पोलिसांनी १९ जानेवारी रोजी यवतमाळ येथे जावून मुख्य आरोपीच्या घरुन चारचाकी वाहन जप्त केले. दरम्यान १९ तारखेलाच संध्याकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान १०० रुपयाच्या २ नकली नोटा फिर्यादी निसार खॉ यांना आपल्या महात्मा फुले चौकातील पानठेल्यावर आढळल्याची माहिती प्राप्त झाली. सदर नोटा पोलिस स्टेशन कारंजा येथे जमा करणार असल्याचे निसार खॉ यांनी सांगितले. १०० रुपयाच्या बनावट नकली नोटा प्रकरणी कारंजा पोलिस कसुन तपास करीत असून, बनावट नोटा कुठे बनविण्यात आल्या व ज्या मशीनव्दारे बनविण्यात आल्या त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराचे नाव पोलिसांना प्राप्त झाल्याची माहिती असून, तपासाची चक्रे गतीमान पध्दतीने फिरत आहेत. दरम्यानच्या कालावधीत कारंजा येथील महात्मा फुले चौकातील फिर्यादी असलेल्या पानठेला चालकाला १९ जानेवारी रोजी पुन्हा १०० रुपयाच्या २ नोटा आढळुन आल्या आहेत. सदर माहिती कारंजा पोलिस स्टेशनला देत असल्याची त्याने सांगितले. यावरुन कारंजा शहराव्यतिरिक्त इतरही ठिकाणी गर्दीच्या वेळी १०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात येत असल्याचे सिध्द होत आहे. नागरिकांनी १०० रुपयाची नोट घेतांना तपासणी करुन घ्यावी, अन्यथा आर्थिक नुकसान होणार आहे. आजकाल १०० च्या नोटेला कमी महत्व आहे. परंतु बनावट १०० च्या नोटा चलनात आल्यामुळे १०० रुपये नोट सुध्दा सुध्दा संबंधीतांने तपासून घ्यावी याबाबीचा प्रचार होणे गरजेचे आहे. कारंजा पोलिसांनी उघड केलेल्या १०० रुपयाच्या बनावट नाटाचे प्रकरण सध्या चर्चेत असून, सर्व नागरिकांनी १०० रुपयाची नोट घेतांना दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले.